
एकीकडे सर्वत्र कोरोनाशी दोन हात सुरू असतानाच सोमवारी महाडवासीयांवर ऐन गणेशोत्सवात आणखी एक ‘विघ्न’ ओढवले. काजळपुऱ्यावर काळाने घाला घातला. नदीकिनारी असलेली अवाढव्य पाच मजली ‘तारिक गार्डन’ इमारत अक्षरश: पत्त्यासारखी कोसळली. ही भयंकर दुर्घटना सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. एका क्षणात होत्याचे नव्हते झाले. प्रचंड आवाज करीत कोसळलेल्या या इमारतींमुळे गावकरी सैरावैरा धावत सुटले. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली सुमारे 200 रहिवासी अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. स्थानिक नागरिकांनी तातडीने बचावकार्य सुरु केले असून माणगावहून मदत यंत्रणा रात्री पोहोचली, तर पुण्याहून एनडीआरएफची तीन पथकेही मदतकार्यात गुंतली आहेत. ढिगाऱ्याखालून एकाची जिवंत सुटका करण्यात आली, तर दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले. तीसजण जखमी झाले असून त्यांना विविध रुग्णालयांमध्ये दाखल केले आहे. रात्री उशिरापर्यंत हे बचावकार्य सुरू होते. कोसळलेल्या ढिगाऱ्याभोवती सुरू असलेल्या आप्त आणि नातेवाईकांच्या किंकाळ्या आणि आक्रोशाने अवघे महाड हादरून गेले.
‘तारिक गार्डन’ या इमारतीमध्ये 50 हून अधिक फ्लॅट्स होते. महाडमधीलच फारुख काझी या बिल्डरने ही इमारत बांधली होती. बहुतेक सर्वजण मुस्लिम बांधव असून ध्यानीमनी नसतानाही अचानक मोठा आवाज होत ही इमारत धाडकन कोसळली. काय होतेय हेच कुणाला समजेना. फक्त ओरडण्याचा आणि बचाव…बचाव… असा आवाज. इमारत पडताना एखादा बॉम्ब फुटल्यासारखा भयानक आवाज आला आणि काही क्षणात होत्याचे नव्हते झाले. सर्वत्र धूर आणि ढिगारा. त्यात अनेकांचे ओरडण्याचे आवाजही दबले गेले. या अनपेक्षित घटनेमुळे केवळ महाडच नव्हे, तर संपूर्ण रायगड जिल्हा हादरला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर इमारत कोसळण्याची रायगडातील ही पहिलीच घटना आहे.
मदतकार्य वेगात सुरू
‘तारिक गार्डन’ इमारत कोसळल्याचे वृत्त वाऱ्याच्या वेगाने पसरताच जिल्हा प्रशासनाने तातडीने मदतकार्य हाती घेतले. एनडीआरएफच्या टीमसह जिल्ह्यातील चार रेस्क्यू टीम तसेच विविध स्वयंसेवी संस्थांची पथके घटनास्थळी रवाना झाली असून त्यांनी मदतकार्य सुरू केले. दहाहून अधिक अॅम्ब्युलन्स, पाचहून अधिक फायर ब्रिगेडच्या गाड्या, पोकलेन मशीन्स,चार जेसीबी, चार डंपर आदींच्या सहाय्याने ढिगारे उपसले जात आहेत. माणगाव, श्रीवर्धन तसेच अन्य भागातून अतिरिक्त कुमक मागवली आहे.
जखमींची संख्या वाढण्याची शक्यता
या दुर्घटनेतील 30 जखमींना महाड ग्रामीण रुग्णालय आणि देशमुख नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले आहे. जखमींवर तातडीने उपचार सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आरोग्य यंत्रणेला दिले आहेत. रानडे अॅक्सिडंट हॉस्पिटल, आदित्य नर्सिंग होम, महाड ग्रामीण रुग्णालय तसेच उत्पादक संघटनेच्या रुग्णालयातही जखमींवर उपचार करण्यात येत आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेले रहिवासी लक्षात घेता जखमींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
शिवसैनिक धावले
इमारत पडल्याचे समजताच शिवसेनेचे आमदार भरत गोगावले, शहरप्रमुख नितीन पावले, युवासेनेचे पदाधिकारी सिद्धेश पाटेकर, विकास गोगावले यांच्यासह शंभरहून अधिक शिवसैनिकांनी धाव घेऊन तातडीने मदतकार्य सुरू केले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे हे मदतकार्यावर लक्ष ठेवून आहेत.
गणपती बाप्पा त्यांना वाचव
घराघरात विघ्नहर्ता गणरायाची उपासना सुरू असतानाच काजळपुरा येथील तारिक गार्डन ही इमारत कोसळल्याची वार्ता पसरली. या इमारतीमध्ये मोठ्या संख्येने मुस्लीम बांधव राहत आहेत. आज महाडवासियांनी आपल्या घरांतील विघ्नहत्र्यालाच साकडे घालून बाप्पा, संकटात सापडलेल्या आमच्या बांधवांना वाचव, अशी प्रार्थना केली. या दुर्घटनेतील जखमी लहान मुले, महिला, वृद्धांच्या प्रकृतीत सुधारणा होऊ दे असा नवसच बाप्पाच्या पुढे केला.
सरकार मदत करणार
इमारत कोसळल्याच्या घटनेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. ही घटना दुर्दैवी असून आधी जलदगतीने मदतकार्य करून जखमींवर चांगले उपचार करा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना दिले आहेत. त्यांनी जिल्हाधिकारी निधी चौधरी तसेच स्थानिक आमदार भरत गोगावले यांच्याशी चर्चा केली असून जखमींना मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
पिलर्स का तुटले?
2011 साली बांधलेल्या या इमारतीचे पिलर्स काही ठिकाणी तुटून ते कमकुवत झाले होते अशी माहिती काही स्थानिक रहिवाशांनी दिली. मात्र पिलर्स तुटण्यामागे नेमके कोणते कारण होते हे चौकशीअंतीच स्पष्ट होणार आहे. अशी तकलादू इमारत बांधणारा बिल्डर नेमका कुठे आहे, या इमारतीची बांधकाम परवानगी दिली कशी असे अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण झाले आहेत.
…. आणि 25 जीव बचावले
कोणतीही कल्पना नसताना पाच मजली इमारत पत्त्याप्रमाणे कोसळत असताना अक्षरश: चमत्कार झाला. इमारतीमध्ये राहणारे 25 जण जिवाच्या आकांताने घराबाहेर पळाले. त्यामुळे त्यांचा जीव वाचला. जे पळाले ते या भयंकर घटनेतून बचावले; पण त्यांचे रक्ताचे, जीवाभावाचे लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याने त्यांच्या चेहऱ्यावर काळजी आणि डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या.




























































