
सामना ऑनलाईन, मुंबई
मुंबईतील जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाच्या प्रश्नावर राज्य सरकार गंभीर असून त्यांच्या पुनर्विकासाबाबत लवकरच तरतूद करण्यात येणार आहे. त्यासाठी विकास नियंत्रण नियमावलीमध्ये आवश्यक तरतूद करण्यात येणार असून म्हाडा कायद्यातही सुधारणा करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे उद्योग मंत्री तसेच मुंबई शहर जिह्याचे पालक मंत्री सुभाष देसाई यांनी आज दिली.
मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीची बैठक सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी त्यांनी याबाबतची माहिती दिली.मुंबईतील रेल्वेवरील पूल तसेच शहरातील विविध जुन्या पुलांच्या अनुषंगाने या बैठकीत चर्चा करण्यात आली. महापालिका आयुक्तांनी शहरातील पुलांच्या कामाचा आढावा घ्यावा तसेच पुलांच्या दुरुस्तीच्या कामाला गती देण्यासाठी रेल्वे मंत्र्यांची वेळ घेऊन रेल्वे विभाग आणि मुंबई पोर्ट ट्रॅस्ट आदी विभागांची एकत्रित बैठक घ्यावी, असे आदेश पालक मंत्री देसाई यांनी दिले.
प्रलंबित विषय तातडीने मार्गी लावा
बैठकीत मुंबईतील रस्त्यांची कामे, वाहतूक व्यवस्थापन, वीजपुरवठा, पाणीपुरवठा, आरोग्य, शाळा इमारती, मच्छीमार, फेरीवाल्यांचे प्रश्न आदी विषयी गेल्या बैठकीत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांच्या पूर्ततेबाबत आढावा घेण्यात आला. देसाई यांनी प्रलंबिल असलेले विषय गतीने मार्गी लावावेत, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
आदिवासींसाठीचा निधी मार्चपर्यंत खर्च करणार
या वेळी जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे म्हणाले, जिल्हा वार्षिक योजना-1919-20 अंतर्गत सर्वसाधारण योजनेचा आराखडा 125 कोटी रुपयांचा, अनुसूचित जाती उपयोजनेचा आराखडा 18 कोटी 76 लाख आणि ओटीएसपीसाठी 16 लाख 55 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली असून हा सर्व निधी मार्च 2020पर्यंत खर्ची पडेल यासाठी आवश्यक ती दक्षता घेण्यात येईल.
या बैठकीत जिल्हा वार्षिक योजना-2018-19मधील खर्चाच्या अहवालास मान्यता देण्यात आली. 2018-19च्या वार्षिक योजनेअंतर्गत सर्वसाधारण योजनेसाठी 116 कोटी 28 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यापैकी 115 कोटी 58 लाख रुपये खर्च झाला आहे.
अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 18 कोटी 76 लाख रुपयांची तरतूद आणि 11 कोटी 5 लाख रुपयांचा प्रत्यक्ष खर्च झाला आहे.
आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील योजनेसाठी (ओटीएसपी) 1 कोटी 58 लाख रुपयांची तरतूद आणि 1 कोटी 39 लाख रुपये प्रत्यक्ष खर्च झाला आहे. या खर्चातील मुद्दय़ांविषयी बैठकीत चर्चा करण्यात आली.




























































