माझ्यामुळे भाजप महाराष्ट्रात सत्तेवर! मंत्री करून भाजपने माझ्यावर उपकार केले नाहीत!!

भाजपला २०१४ मध्ये मुख्यमंत्री मी केले. त्यामुळे मला मंत्री करून भाजपने माझ्यावर उपकार केले नाहीत, तर माझ्यामुळे भाजप पक्ष महाराष्ट्रात सत्तेत होता, असा सणसणीत टोला राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांनी भाजप पक्षाला लगावला. न्हावरे येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने मिशन – २०२४ अंतर्गत काढण्यात आलेल्या ‘जनस्वराज्य यात्रे’ निमित्त झालेल्या सभेत ते बोलत होते. जानकर म्हणाले की, भाजप आणि काँग्रेस एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हे दोन्हीहीपक्ष वेश बदलून सर्वसामान्य जनतेला लुटण्याचे काम करत आहेत. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे ज्येष्ठ नेते रामकृष्ण बिडगर, तालुकाध्यक्ष शिवाजी कुऱ्हाडे, भरत गडधे, माउली सलगर, अजित पाटील, विनायक रुपनवर, सुनील बंडगर, सुवर्णा जराड, सुनीता किरवे, चेतना पिंगळे, सागर कोळपे, संजय माने, ज्ञानेश्वर सलगर, रतन पांडुळे या मान्यवरांची भाषणे झाली. याप्रसंगी रासपचे राष्ट्रीय महासचिव कुमार सुशिल पाल, प्रभाकर जांभळकर, भाऊसाहेब धायगुडे, तात्यासाहेब टेळे उपस्थित होते.