जानकरांनी धरला काँग्रेसचा हात! पालिका, जिल्हा परिषद निवडणुका एकत्र लढणार

mahadev jankar rasp joins hands with congress for municipal and zp elections

राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी काँग्रेसचा हात धरला आहे. रासप व काँग्रेस पक्ष महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका एकत्र लढणार असल्याची घोषणा महादेव जानकर व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज केली.

टिळक भवन येथे आज रासप अध्यक्ष महादेव जानकर व हर्षवर्धन सपकाळ यांच्यात आघाडीबाबत सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत आघाडीची घोषणा केली. यावेळी सपकाळ म्हणाले की, जानकर हे बहुजन समाजाचा आश्वासक आवाज आहेत. नगरपालिका निवडणुकीत आघाडीची औपचारिक घोषणा केलेली नव्हती, पण सातारा, सांगली तसेच मराठवाडा व विदर्भात एकत्र निवडणुका लढलो आहोत आणि तीच भूमिका पुढे घेऊन जात आगामी काळात सोबत राहण्याचा निर्णय झाला असल्याचे सपकाळ म्हणाले.

शिवसेना–मनसे युतीला शुभेच्छा – सपकाळ

शिवसेना-मनसे युतीला आमच्या सदिच्छा व शुभेच्छा आहेत. आम्ही जोडणारे आहोत तोडणारे नाही. विधानसभा व लोकसभा निवडणुकीत मविआ एकत्र लढली, पण मुंबई पालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढवाव्यात अशा कार्यकर्त्यांच्या भावना आहेत, असेही सपकाळ म्हणाले.

जागा किती यापेक्षा लोकशाही वाचवण्याची गरज – जानकर

शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार घेऊन काम करत असताना समविचारी पक्षांनी एकत्र असावे या भावनेतून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतली होती. काँग्रेसबरोबर रासपची आघाडी 31 मे रोजीच झाली आहे. जागा किती मिळणार यापेक्षा आजघडीला संविधान व लोकशाही वाचवण्याची नितांत गरज आहे. तसेच सामान्य लोकांना मानसन्मान मिळाला पाहिजे, असे जानकर म्हणाले.