
सामना ऑनलाईन । जयपूर
राजस्थानच्या नागौरमध्ये गोशाळा आणि गायींसाठी तपासणी केंद्र चालवणाऱ्या महामंडलेश्वर कुशालगिरी यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्याने त्यांनी शुक्रवारी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जोधपूरमधील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. कुशालगिरी यांच्या संस्थेतच काम करणाऱ्या एका तरुणीने कुशालगिरी यांनी आपल्यावर बलात्कार केल्याची तक्रार गुरुवारी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. तिची तक्रार नोंदवून पोलीस चौकशी करत होते. आपल्यावर बलात्काराचा आरोप झाल्याची माहिती मिळाल्यावर कुशालगिरी यांनी शुक्रवारी सकाळी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
कुशालगिरी यांच्या संस्थेत गोपालनासह आजारी असलेल्या गायीवंर उपचार करण्यात येतात. याच संस्थेत काम करणाऱ्या एका तरुणीने कुशालगिरी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली, अशी माहिती नागौर पालीस ठाण्याचे एसएचओ सहदेव चौधरी यांनी दिली. आपण झापलो असताना कुशालगिरी आपल्या खोलीचा दरवाजा उघडून आतमध्ये आले. त्यांनी आपल्याला मारहाण केली आणि बलात्कार केल्याचे तरुणीने तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी वैद्यकीय तपासणीसाठी तिला रुग्णालयात पाठवले आहे.
संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की, कुशालगिरी यांनी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. तसेच त्यांच्या तोंडातून फेस येत असल्याचेही कर्मचाऱ्यांनी सांगितले. मात्र, कुशालगिरी यांनी गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला किंवा त्यांनी विष प्राशन केले होते, याबाबत निश्चित माहिती मिळाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.






















































