महानंदकडे दुधाचा तुटवडा! दैनंदिन मागणी पूर्ण करताना कसरत; विक्रीवर गंभीर परिणाम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील सहकारी दूध संघांची शिखर संस्था असलेल्या महानंद डेअरीकडे दुधाचा तुटवडा आहे. डेअरीचे दीड लाख लिटर दुधाचे दैनंदिन वितरण आहे. मात्र सध्या डेअरीकडे दररोज सुमारे एक लाख 30 हजार लिटर दूध उपलब्ध होत आहे. त्यामुळे डेअरीला दुधाची दैनंदिन मागणी पूर्ण करताना मोठी कसरत करावी लागत आहे. तसेच वितरणासाठी दूध उशिराने उपलब्ध होत असल्याने त्याचा दुधाच्या विक्रीवर गंभीर परिणाम होत आहे.

महानंदचे राज्यभरातील 85 जिल्हा आणि तालुका दूध संघ सभासद असून त्यांच्या माध्यमातून डेअरी शेतकऱयांकडून दुधाचे संकलन करते. मात्र सध्या उन्हाळय़ामुळे राज्यात दुधाच्या उत्पादनात घट झाली आहे. त्यातच जे दूध शेतकऱयांकडून उपलब्ध होत आहे, त्यापैकी जवळपास 58 दूध संघ महानंदला दूधच उपलब्ध करून देत नाहीत. त्यामुळे डेअरीला दुधाची दैनंदिन मागणी पूर्ण करणे कठीण झाल्याचे डेअरीच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले. दरम्यान, दुधाच्या तुटवडय़ामुळे आणि वितरणासाठी दूध उशिरा उपलब्ध होत असल्याने विक्रीमध्ये मोठी घसरण होण्याची भीती वितरकांकडून व्यक्त होत आहे.

प्रति लिटरसाठी 40 रुपये खर्चूनही दूध मिळेना

राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱयांनी महानंद डेअरीला दूध उपलब्ध करून द्यावे म्हणून डेअरी प्रति लिटर दुधाला 35 रुपये दर देत आहे. तसेच स्थानिक पातळीवरील संघाला दूध संकलनासाठी जवळपास साडेतीन रुपये आणि दोन रुपये वाहतूक खर्च असे एक लिटर दुधासाठी 40 रुपये 50 पैसे खर्च करत आहे. तरीही महानंदला पुरेसे दूध उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे.