महानंद डेअरीची दुधासाठी वणवण; दैनंदिन मागणी पूर्ण करताना तारेवरची कसरत

राज्यातील सहकारी दूध उत्पादक संघांची शिखर संस्था असलेल्या महानंद डेअरीची सध्या दुधासाठी वणवण सुरू आहे. डेअरीला दररोज सुमारे अडीच-तीन लाख लिटर दुधाची आवश्यकता आहे. त्या तुलनेत सभासद संघ कमी दुधाचा पुरवठा करत आहेत. त्यामुळे डेअरीला आपली दैनंदिन मागणी पूर्ण करण्यासाठी खासगी संस्थांकडून दुधाची खरेदी करण्याचा खटाटोप करावा लागत आहे.

तसेच अपुऱया दुधामुळे अनेकदा टेट्रापॅकिंगचा दूध प्लांट बंद ठेवण्याची नामुष्की ओढावत आहे. त्या पार्श्वभूमीवर सभासद संघांनी ठरवून दिलेल्या कोटय़ापेक्षा अधिक दुधाचा पुरवठा केल्यास त्यांच्या प्रतिलिटर दुधाला सध्याच्या दरापेक्षा एक रुपया जास्त म्हणजे 30 रुपये दर देण्याचा निर्णय घेतला आहे.

महानंद डेअरीकडून दररोज एक-दीड लाख लिटर पिशवीबंद दुधाचे वितरण केले जात असून दही, ताक, लस्सी या सहउत्पादनांना आणि टेट्रापॅकिंगसाठी जवळपास एक लाख लिटर दुधाची आवश्यकता आहे. महानंदचे राज्यभरात 65 जिल्हा आणि तालुका सहकारी दूध संघ सभासद असून त्यांच्याकडून दुधाचा पुरवठा होतो. मात्र सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात दूध पावडरीला चांगला दर मिळत असल्याने सर्व खासगी दूध संघ जास्तीत जास्त दूध पावडर तयार करण्यासाठी वापरत आहेत. त्यामुळे राज्यभरात दुधाचा तुटवडा आहे.

सभासद संघांकडूनही त्यांना निश्चित करून दिलेल्या कोटय़ाच्या तुलनेत कमी पुरवठा केला जातो. त्याचा महानंदच्या एकूणच दूध वितरणावर आणि इतर सहउत्पादनांवर होत आहे. त्याची दखल घेत सभासद संघांकडून पुरेशा दुधाचा पुरवठा व्हावा म्हणून पुढील दहा दिवसांसाठी वाढीव दर देण्याचा निर्णय घेतला आहे.

महानंद डेअरी सध्या 29 रुपये प्रतिलिटर दराने दुधाची खरेदी करत आहे. यापुढे सभासद संघांनी त्यांना ठरवून दिलेल्या दुधाच्या कोटय़ापेक्षा 50 टक्के अधिक दूध पुरवल्यास त्यांच्या सरसकट दुधाला 30 रुपयांचा दर देण्यात येणार आहे.
-डी. के. पवार, उपाध्यक्ष, महानंद डेअरी

आपली प्रतिक्रिया द्या