
महाराष्ट्रावर कृपादृष्टी कायम ठेवून राज्याची भरभराट करावी आणि राज्यातील शेतकरी व कष्टकरी यांना यश द्यावे, असे साकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्री विठ्ठल चरणी घातले. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या हस्ते शासकीय महापूजा करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
अजित पवार म्हणाले, श्री विठ्ठलाच्या आशीर्वादाने आणि शासकीय उपाययोजनांमुळे राज्यावरील कोरोनाचे संकट कमी होत आहे. त्यामुळे सर्व मंदिरे खुली करण्याचा शासनाने निर्णय घेतला. तसेच कार्तिकी वारीसही परवानगी दिली. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीने मंदिर विकासाच्या आराखडय़ासह केलेल्या विविध मागण्यांबाबत शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी दिली.
त्रिपुरातील घटनेमुळे मालेगाव, नांदेड व अमरावती येथे काही घटना घडल्या. अशा प्रकारांमुळे पोलिसांवर ताण पडतो. राज्यातील नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. जातीय सलोखा राखण्याची आपल्या राज्याची परंपरा कायम ठेवण्यासाठी प्रत्येकाने सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले. शासकीय महापुजेसाठी मानाचे वारकरी म्हणून कोंडीबा टोणगे, प्रयागबाई टोणगे यांना मान मिळाला.






























































