दहावीचा निकाल ऑगस्टमध्ये; अकरावी प्रवेशावर परिणाम, पुढच्या वर्षीचेही प्रवेश लटकणार

कोरोनामुळे यंदाची अकरावीची प्रवेशप्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे अकरावीचे वर्गही सुरू झालेले नाहीत त्यातच आता एप्रिलमध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षेचा निकाल ऑगस्ट अखेरीस लागणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे अकरावीचे पुढच्या वर्षीचे प्रवेशही लटकण्याची चिन्हे आहेत. निकाल जाहीर होऊन प्रत्यक्ष प्रवेशास सुरूवात होण्यास सप्टेंबरचा शेवटचा आठवडा उजाडण्याची शक्यता आहे.

अकरावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे?

यंदा अकरावीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे यूटयूबच्या माध्यमातून आँनलाईन वर्ग सुरू असून पुढे या विद्यार्थ्यांना बारावीत प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठी या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करायचे याविषयी लवकरच निर्णय घेतला जाईल, असे शालेय शिक्षणमंञी वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

कॉलेजना ऑनलाइन वर्ग घेण्याची परवानगी द्या

यापूर्वी अकरावीचे 70 टक्के प्रवेश पूर्ण झाल्यावर कॉलेज सुरू करण्याची परवानगी शिक्षण विभाग देत होते. मात्र अद्याप तरी शिक्षण विभागाकडून कोणतीही सूचना आली नसल्याचे नाँन गर्व्हमेंट काँलेज प्रिन्सिपल असोसिएशनचे टी.ए.शिवारे यांनी सांगितले. तसेच काही काँलेजनी शिक्षण विभागाच्या सूचनांची वाट न पाहता प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे आँनलाईन वर्ग सुरू केल्याचेही ते म्हणाले.

अभ्यासक्रम ठरलेला नाही; परीक्षा कशी घेणार

अकरावीचे सत्र उशीराने सुरू झाल्यामुळे अभ्यासक्रम कमी होईल, अशी अपेक्षा प्राचार्यांना आहे. शिक्षण विभागाकडून अकरावीचा अभ्यासक्रम किती असेल याविषयी कोणत्याही सूचना न आल्याने परीक्षा कशी घेणार हा प्रश्न सध्या काँलेजसमोर असल्याचेही शिवारे यांनी सांगितले

आपली प्रतिक्रिया द्या