ईव्हीएमना तिहेरी सुरक्षा,सीआरपीएफ, एसआरपी आणि पोलिसांचा गराडा

338

मतदान झाल्याने विधानसभेच्या महासंग्रामात उतरलेल्या उमेदवारांची धावपळ संपली असली तरी धाकधूक मात्र वाढली आहे. मतदारराजा कुणाला प्रसन्न होणार, कुणाच्या पारडय़ात किती मते पडणार? असे एक ना अनेक प्रश्न उमेदवारांना सतावत असून जनतेचा कौल आपल्यालाच मिळावा यासाठी त्यांनी प्रार्थना, जपतप सुरू केले आहेत. तर दुसरीकडे उमेदवारांचे भवितव्य ज्या मतपेटीत बंद झाले आहे त्या ईव्हीएम मशीनला कोणताही धोका पोहचू नये, कोणतीही गडबड होऊ नये यासाठी मतदान यंत्र ज्या ठिकाणी ठेवण्यात आली आहेत त्या परिसराला अर्थात स्ट्राँग रूमला केंद्रीय पोलीस, राज्य राखीव पोलीस व स्थानिक पोलीस अशी तिहेरी सुरक्षा व्यवस्था आहे.

नो जॅमर

राज्यातील 288 मतदारसंघांत निवडणुकीस उभ्या असलेल्या उमेदवारांचे भवितव्य 21 ऑक्टोबरला ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले असून 24 ऑक्टोबरला जनतेचा कौल कुणाला हे स्पष्ट होणार आहे. या मशीन हॅक होण्याची तसेच मतदान यंत्रात गडबड होण्याची भीती विरोधकांकडून व्यक्त केली जात आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे ईव्हीएम ठेवण्यात आलेल्या स्ट्राँग रूमच्या परिसरात जॅमर बसविण्याची मागणी केली आहे. दरम्यान, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी ईव्हीएम मशीन फूलप्रूफ असल्याने त्या हॅक होऊ शकत नाहीत. त्यामुळे तेथे जॅमर लावण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले आहे.

प्रत्येक फेरीच्या मतांची मोजणी झाल्यानंतर मतांची आकडेवारी तत्काळ जाहीर करावी व त्यानंतरच पुढच्या फेरीची मोजणी करावी. व्हीव्हीपॅटच्या मोजणीसाठी मतदान यंत्र निवडीची मुभा उमेदवारांना द्यावी. तसेच कोणत्याही मतदान यंत्राबाबत शंका निर्माण झाल्यास त्या मतदान यंत्रातील मतांची मोजणी सलग चारवेळा करण्यात यावी आणि 50 टक्के व्हीव्हीपॅटची मोजणी करावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

सील स्ट्राँग रूम

ईव्हीएम मशीन्स ठेवलेल्या स्ट्राँग रूम सील केल्या आहेत. निवडणूक रिंगणातील उमेदवारांच्या उपस्थितीत सोमवारी रात्री स्ट्राँग रूम सील केल्या असून त्यावर उमेदवारांच्या सह्या घेतल्या आहेत. 24 ऑक्टोबरला उमेदवारांच्या उपस्थितीत स्ट्राँग रूम उघडल्या जातील. त्याशिवाय उमेदवारांच्या कार्यकर्त्यांना मतमोजणी केंद्रात 24 तास वास्तव्य करण्याची मुभा दिली आहे.

एक्झिट पोलमुळे काँग्रेसचा तीळपापड

शिवसेना-भाजप महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेवर येणार असे चित्र सर्वच एक्झिट पोलमधून समोर आले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचा सुपडा साफ झाल्याचे एक्झिट पोलमध्ये दिसले आहे. त्यामुळे काँग्रेसला तीळपापड झाला असून निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच एक्झिट पोल जाहीर करणाऱ्या वृत्तवाहिन्यांनी मतदारसंघनिहाय निकाल सांगावा अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. देशातील प्रत्येक बिघडलेले मतदान यंत्र कमळावरच मतदान कसे करते असा प्रश्न मतदारांना पडल्याचे ते म्हणाले.

विधानसभा निवडणुकीची मतमोजणी

24 ऑक्टोबरला होणार आहे. राज्यात सत्ता कोणाची येणार, कोणत्या उमेदवाराला किती मते मिळणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे. त्यामुळे मतमोजणी सुरू झाल्यावर निकाल दाखवण्यासाठी मंत्रालयाच्या गार्डन गेटवर (आकाशवाणीच्या समोर) इलेक्ट्रॉनिक्स स्क्रीन लावण्यात येणार आहे. पावसापासून स्क्रीनचा बचाव करण्यासाठी मंडप उभारण्याचे काम सुरू होते.

कडेकोट बंदोबस्त

राज्यातल्या मतमोजणी केंद्रांमधील स्ट्राँग रूममध्ये ईव्हीएम मशीन्स अतिशय कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आलेली आहेत. या स्ट्राँग रूमच्या बाहेर तीन पदरी सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. पहिल्या वर्तुळात सेंट्रल रिझर्व्ह पोलीस, दुसऱ्या वर्तुळात राज्य राखीव पोलीस दल व तिसऱ्या वर्तुळात स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त अशा तीन लेअरमध्ये सुरक्षा व्यवस्था आहे.

सीसीटीव्ही वॉच

मतदान झाल्यावर सर्व ईव्हीएम मशीन्स मतमोजणी केंद्रातील स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आली आहे. या स्ट्राँग रूमच्या व मतमोजणी केंद्राच्या परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतमोजणी केंद्राच्या परिसरात मोटारी किंवा कोणालाही प्रवेश दिला जात नाही. संपूर्ण परिसरावर सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या