
महाराष्ट्राच्या निवडणुकांचे बिगुल कोणत्याही क्षणी वाजण्याची शक्यता आहे. ‘महाराष्ट्राचा महासामना’ आता सुरू होणार असून राष्ट्रवादीकडून त्याआधीच पाच उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र आता नव्या लोकांच्या हाती देणार म्हणत शरद पवारांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा केली.
बीड मध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला या मेळाव्यात त्यांनी सरकारवर टीका केली. ‘सध्या राज्यात शेतकऱ्यांची अवस्था बघवत नाही. या सरकारने शेतकऱ्यांसाठी काय केले असा सवाल उपस्थित करून तब्बल 16 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, शेतकऱ्याच्या मुलाचे शिक्षण थांबले आहे, मुलीचे विवाह राहिले आहेत, 16 हजार कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत, सरकार फक्त उघडया डोळ्याने बघत आहे, आम्ही शेतकऱ्यांसाठी कर्ज माफी केली तब्बल 86 हजार कोटींची कर्ज माफ केले, आज मात्र शेतकऱ्यांना अवमान सहन करावा लागत आहे, थोड्याशा कर्जासाठी त्याची भांडीकुंडी बाहेर फेकली जात आहेत, राज्यात अभूतपूर्व बेकारी झाली आहे, शेतकरी मुलांना शिकवत आहे मात्र नोकऱ्या नाहीत, हाताला काम नाही बेकारी वाढत आहे’, असे पवार म्हणाले.
‘आजचा तरुण नैराशाच्या गर्तेत आहे, एकट्या नाशिकमध्ये 16 हजार नोकऱ्या गेल्या, मुंबईमध्ये ही हीच परिस्थिती आहे. अवघ्या 16 हजार कामगार गिरणीत काम करत आहेत, मुंबईत मराठी माणूस गायब होत आहे, याकडे कोणाचेच लक्ष नाही’, असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादी आता नव्या लोकांच्या हातात देणार असल्याचे सांगत उमेदवारी जाहीर केली.
बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या यादीत बीडमधून संदीप क्षीरसागर, गेवराई मधून विजयसिंह पंडित, केज मधून नमिता मुंदडा, परळी मधून धनंजय मुंडे तर माजलगाव मधून प्रकाश सोळुंके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.





























































