शिवसेना सत्तेत आहे आणि सत्तेतच राहणार! उद्धव ठाकरे यांचा ठाम विश्वास

685

राज्यात सर्वत्र भगवे चैतन्य पसरले आहे आणि महायुतीचे तुफान उसळले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मंत्रालयावर डौलाने भगवा फडकणार असून शिवसेना सत्तेत आहे आणि सत्तेतच राहणार असा ठाम विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

शिवसेना-भाजप महायुतीचे धाराशीव येथील उमेदवार कैलास पाटील व परंडा येथील उमेदवार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या प्रचारासाठी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची दणदणीत सभा झाली. ऑक्टोबर हीट असल्यामुळे उन्हाचा पारा प्रचंड वाढलेला असून रणरणत्या उन्हात उद्धव ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी भगवा जनसागरच उसळला होता. कालच शिवसेनेचा वचननामा मी जाहीर केला. दहा रुपयांत गरीबांना पोटभर जेवण देण्याचे वचन मी दिले आहे. होय, देणार म्हणजे देणारच! शिवसेना बोलेल ते करून दाखवतेच! पण काही जणांना त्यातही भ्रष्टाचार दिसतोय. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांना दहा रुपयांत जेवण कसे देणार याची चिंता लागलीय. अरे, तुम्ही कशाला चिंता करताय. आम्ही समर्थ आहोत ना दिलेला शब्द पाळण्यासाठी. स्वयंपाक करण्यासाठी यांच्या हातात राज्य द्यायचे काय, असेही पवार म्हणाले. मी स्वयंपाक केल्याने गरीबांचे पोट भरणार असेल तर मी आनंदाने स्वयंपाक करायला तयार आहे. तुमच्यासारखी धरणे भरण्यापेक्षा स्वयंपाक केलेला केव्हाही चांगला असा भीमटोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या धाराशीव येथे झालेल्या या सभेस शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, खासदार ओप्रकाश राजे-निंबाळकर, महायुतीचे उमेदवार कैलास पाटील, ज्ञानराज चौगुले, सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे, शंकरराव बोरकर, नगराध्यक्ष मकरंद राजे-निंबाळकर आदींची उपस्थिती होती.

जुन्या शिवसैनिकांचा मान राखणार
निवडणुकीच्या अगोदर वातावरण वेगळे होते. आपण अख्खा महाराष्ट्र लढवण्याची तयारी केली होती, परंतु युतीच्या वाटाघाटी झाल्या. महाराष्ट्राच्या हितासाठी काही कटू निर्णय घ्यावे लागले. हे निर्णय घेत असताना आपण आपल्या रक्तामांसाच्या माणसांवर अन्याय करत आहोत याची सल होती, परंतु इलाज नव्हता. मात्र निष्ठावान शिवसैनिकांनी मनाचा मोठेपणा दाखवला. हेच शिवसेनेचे वैभव आहे. यांना विसरून कसे चालेल? आपले सरकार येणारच आहे, तेव्हा या निष्ठावंतांचा मान राखला जाईल अशी ग्वाहीच यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिली.

पुन्हा स्वाती पिटले नको…
शाळेला जाण्यासाठी पैसे नाहीत म्हणून स्वाती पिटले या विद्यार्थिनीने आत्महत्या केली. काळजाला घरे पाडणारी ही घटना. मी स्वतः त्यावेळी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याशी बोललो. आपण त्यावेळी विद्यार्थ्यांसाठी मोफत पासेसची योजना आणली होती. आताही शिवसेनेच्या वचननाम्यात विद्यार्थ्यांसाठी अनेक योजना आपण आणल्या आहेत. शिवसेनाप्रमुखांचा संस्कार घेऊन आपण पुढे जात आहोत. नवी पिढी घडवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले.

अजित पवार महाराष्ट्राची माफी मागा
शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक करणे ही चूकच होती अशी उपरती अजित पवारांना झाली आहे. मग त्यावेळी काय मती गुंग झाली होती का? शरद पवार मार्गदर्शक होते ना, त्यांनी का नाही सांगितले. एवढेच वाटते ना मग अजित पवार या चुकीबद्दल कबुली काय देता, महाराष्ट्राची माफी मागा! न्यायालयाने तुमच्या कंबरडय़ात हातोडा घातला नाहीतर मुंबई पेटली असती अशा तिखट शब्दांत उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांची सालटी काढली. यांना म्हणे भावना आहेत. यांच्या डोळय़ांत अश्रू येतात. शेतकऱ्यांचे अश्रू कधी दिसले नाहीत तुम्हाला? त्यांच्या भावना कधी कळल्या नाहीत! शेतकऱ्यांच्या भावना कळल्या असत्या तर सत्तेसाठी अशी वणवण करण्याची वेळ तुमच्यावर आली नसती असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

ग्रंथालय कर्मचारी संघ सदस्य शिवसेनेत
परभणी येथील जाहीर सभेत महाराष्ट्रातील सात हजार गावांतील लहान-मोठय़ा सरकारी ग्रंथालय संघांच्या 70 हजार सदस्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला.

तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणार
महाराष्ट्रातील 288 मतदारसंघांत आता फक्त धनुष्यबाण आणि कमळ हीच दोन चिन्हे! तिसरे कोणतेही चिन्ह शिल्लक राहता कामा नये. आई जगदंबेच्या कृपेने महाराष्ट्रात भगव्याचे रान पेटले आहे. महायुतीची सत्ता येणारच आहे. विजयाची गुढी घेऊन मी स्वतः तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणार असे उद्धव ठाकरे म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या