कोल्हापुरात मतदार यादीत प्रचंड घोळ, मतदानाऐवजी नावे शोधण्यासाठीच रांगा

897
voting-list-problem

#MahaElection 2019 गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात धुवाधार कोसळणाऱ्या पावसाच्या पार्श्वभूमीवर आज होत असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर पावसाचा परिणाम होताना दिसून येऊ लागला आहे. त्यात कित्येक मतदारांना वोटिंग स्लिप पोहोचल्या नसल्याने, मतदानाऐवजी मतदार यादीतील नावे शोधण्यासाठीच मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसू लागले आहे. मतदानाची टक्केवारी पहिल्या दोन तासात अपेक्षेपेक्षा कमी झाली आहे. यामुळे राज्यात सर्वाधिक मतदानाची टक्केवारी असलेल्या कोल्हापूरची यंदाची मतदानाची टक्केवारी घसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसंदर्भातील Live Updates

सकाळी सात ते नऊ या दोन तासात जिल्ह्यात चंदगड-8.25, राधानगरी-6.4, कागल-8.2, कोल्हापूर दक्षिण-9, करवीर-12.33, कोल्हापूर उत्तर- 6.27, शाहूवाडी- 9.3, हातकणंगले-7, इचलकरंजी-6.7 आणि शिरोळ विधानसभा मतदारसंघात 6 टक्के असे मतदान झाले आहे.

जिल्ह्यात कोसळणारे पावसाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सकाळच्या सत्रात पावसापूर्वी लवकर मतदान करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. रात्रीपासून पावसाचा जोर ओसरला असला तरी सर्वत्र ढगाळ वातावरण असल्याने दुपारनंतर पुन्हा जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परंतु सकाळी सातपासून मतदानाला सुरुवात होऊन सुद्धा मतदारांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचे सर्वत्र दिसून येत आहे. त्यात मतदारांना वोटर स्लीप पोहोचविण्यात निवडणूक विभाग तोकडा पडल्याचे दिसून आले.

बहुतांश ठिकाणी मतदार यादीत ही प्रचंड घोळ झाल्याचे दिसून येत आहे. कित्येक मतदारांना मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी तास-दोन तास पायपीट करावी लागत होती. परिणामी मतदान केंद्रात मतदानासाठी रांगा लागण्याऐवजी मतदान केंद्र बाहेरच मतदारांना मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी रांगा लावाव्या लागत असल्याचे दिसून येत होते. काही मतदारांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत असल्याने याचाही परिणाम मतदाराच्या टक्केवारीवर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे निवडणुकांमध्ये राज्यात मतदानाच्या टक्केवारीत सर्वाधिक आघाडीवर राहणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्याचीच मतदानाची टक्केवारी घसरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

kolhapur-mla-rajesh-kshirsagar
आमदार राजेश क्षीरसागर आणि यांच्या पत्नी व पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कोषाध्यक्ष वैशाली क्षीरसागर यांनी महानगरपालिका मतदान केंद्रात रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजाविला.

दरम्यान, विविध पक्षाच्या नेत्यांनी आणि उमेदवारांनी नागरिकांना मतदानाचा हक्क बजावावा असे कळकळीचे आवाहन देखील केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या