पाच महिन्यांत 1972 विविध ऑनलाइन गुन्ह्यांची नोंद, राज्यभरात बँकिंग फ्रॉड सर्वाधिक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंटरनेटच्या जमान्यात ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार अक्षरशः डोकेदुखी ठरू लागले आहेत. सायबर भामटे रोज काही ना काही क्लृप्त्या लढवून नागरिकांची सर्रास फसवणूक करीत आहेत. राज्यात सद्यस्थितीत वेगवेगळ्या प्रकारे सायबर गुन्हे घडत असून त्यात ऑनलाइन बॅंकिंग फसवणुकीचे गुन्हे सर्वाधिक असल्याचे चित्र आहे.

ऑनलाइनच्या माध्यमातून सायबर भामटे आपले जाळे पसरवतात आणि नागरिकांना शिताफीने त्यात ओढून त्यांची आर्थिक फसवणूक करतात. दररोज कुठल्या ना कुठल्या प्रकारे राज्यभरात ऑनलाइन फसवणुकीचे गुन्हे घडत आहेत. गेल्या पाच महिन्यांत राज्यात नोंदविलेल्या गेलेल्या सायबर गुह्यांची आकडेवारी पाहता ऑनलाइन बॅंकिंग फसवणुकीचे गुन्हे टॉपवर आहेत. केवायसी अपडेट, ओटीपी, कर्ज मिळवून देण्याची बतावणी अशा कोणत्या ना कोणत्या प्रकारे बॅंकिंगशी संबंधित फसवणूक केली जात आहे.

त्यापाठोपाठ क्रेडिट-डेबिट कार्ड फसवणुकीच्या गुन्ह्यांची सर्वाधिक नोंद असून मॅट्रोमोनियल फसवणुकीच्या गुन्ह्यांची सर्वात कमी नोंद गेल्या पाच महिन्यांत झाली आहे. ऑनलाइन फसवणुकीच्या गुह्यांना बळी पडू नका, सायबर गुन्ह्यांपासून आपली कशा प्रकारे सुरक्षा करावी याबाबत सायबर पोलिसांकडून वारंवार सूचना केल्या जातात. मात्र, तरीदेखील सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात दररोज अनेक जण अडकून आपली ऑनलाइन फसवणूक करून घेतात.

गुह्याचा प्रकार                      दाखल गुन्हे   उकल    अटक

ऑनलाइन बॅंकिंग फसवणूक       1402        42       46
क्रेडिट-डेबिट कार्ड फ्रॉड           421          6         5
जॉब फ्रॉड                             60          4         3
गुंतवणूक फ्रॉड                        55          4       12
मॅट्रोमोनियल फ्रॉड                    34          3         4