सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी; महाराष्ट्राची उत्तर प्रदेशवर मात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

महाराष्ट्राने सय्यद मुश्ताक अली टी-20 क्रिकेट स्पर्धेतील ई गटाच्या लढतीत उत्तर प्रदेशचा 12 धावांनी पराभव केला. कर्णधार नौशाद शेखच्या अष्टपैलू कामगिरीमुळे महाराष्ट्राला विजयी सलामी देता आली.

महाराष्ट्राकडून मिळालेल्या 150 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना उत्तर प्रदेशचा डाव 19.3 षटकांत 137 धावांतच संपुष्टात आला. त्यांच्याकडून आघाडीवीर समर्थ सिंगने 93 धावांची खेळी करीत उत्तर प्रदेशच्या विजयासाठी निकराची झुंज दिली. मात्र, दुसर्‍या बाजूने एक एक फलंदाज बाद होत गेल्याने त्याचाही नाईलाज झाला. अखेरच्या षटकात 4 चेंडूंत 12 धावांची गरज असताना महाराष्ट्राच्या दिव्यांग हिमगनेकरने समर्थचा त्रिफळा उडवून उत्तर प्रदेशचा डाव संपविला. महाराष्ट्राकडून सत्यजित बछावने 3 फलंदाज बाद केले, तर समद फल्लाह, मनोज इंगाले व दिव्यांक हिमगणेकर यांनी प्रत्येकी 2 बळी टिपले.

त्याआधी नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्राने 5 बाद 149 अशी समाधानकारक धावसंख्या उभारली. यात सलामीवीर ऋतुराज गायकवाड (35), कर्णधार नौशाद शेख (41), निखिल नाईक (41) व अंकित बावणे (14) यांनी उपयुक्त फलंदाजी केली. उत्तर प्रदेशकडून बॉबी यादवने सर्वाधिक 2 बळी टिपले.