
कोरोनामुळे सध्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग सुरू आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या ऑनलाइन शिक्षण पद्धतीचा आज आढावा घेतला. पहिली ते बारावीपर्यंत शैक्षणिक अभ्यासक्रम ऑनालाइन पद्धतीने असल्याने मोबाईल तसेच संगणक अशा सर्वच उपकरणांसाठी तो सोयीस्कर हवा. ऑनलाइन शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना कोणतीही तांत्रिक अडचण येता कामा नये. हा अभ्यास ऑफलाइनही उपलब्ध व्हायला हवा. यासंदर्भात आमदार, मुख्याध्यापक, शिक्षक यांच्याही सूचना घ्या, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिओ टीव्ही तसेच गुगल मीटद्वारे ऑनलाईन वर्ग कशाप्रकारे भरवता येतात त्याचे प्रात्यक्षिक पाहिले व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शालेय शिक्षण विभागासोबेत आज त्यांनी मिटिंग घेतली त्यावेळी विभागाच्या मंत्री वर्षा गायकवाड यादेखील उपस्थित होत्या. जिओ टीव्हीवर प्रायोगिक तत्वावर दहावी आणि बारावीसाठी दोन वाहिन्या तयार करण्यात आल्या आहेत. तसेच या टीव्हीवर पहिली ते बारावी असे स्वतंत्र 5 वाहिन्यांचेसुद्धा नियोजन आहे असे सांगण्यात आले. दूरदर्शनकडे देखील दिवसाला 4 ते 5 तास शैक्षणिक तास आयोजित करण्याचे नियोजन आहे असे यावेळी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
12वीचा निकाल 15 जुलैपर्यंत 10वीचा जुलैअखेर
यावेळी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी सांगितले की, बारावीचे सर्व पेपर्स कोरोनामुळे लॉकडाऊनपूर्वी संपले होते मात्र दहावीचा केवळ भूगोलाचा पेपर होऊ शकला नव्हता. मात्र आता निकाल लावण्यासाठी वेगाने प्रक्रिया सुरु असून जुलै 15 पर्यंत बारावीचा आणि जुलै अखेरीपर्यंत दहावीचा निकाल लावूच असे सांगितले. 97 टक्के उत्तरपत्रिका या कोरोना काळात परीक्षकांकडून जमा करण्यात आल्या असून स्क्रीनिंगही वेगाने सुरू आहे. अशी माहिती त्यांनी दिली.
11 वी प्रवेश प्रक्रिया व्यवस्थित राबवा!
दहावीच्या निकालानंतर सुमारे दीड महिना अकरावीची प्रवेश प्रक्रिया चालेल. या वर्षांपासून ऑनलाईन पोर्टलमध्येही आवश्यक ते बदल करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शुल्क भरणे, डिजिटल पुस्तिका, मोबाईल अॅप अशा सुविधा देण्यात येत आहेत. 1 जुलैपासून महाविद्यालयांचे नोंदणीसत्र सुरु होईल अशी माहिती यावेळी विभागाने दिली. मुंबई, पुणे, नागपूर, संभाजीनगर, अमरावती, नाशिक या विभागांमध्ये ही प्रक्रिया ऑनलाईन चालणार असून इतरत्र व ग्रामीण भागात ऑफलाईन प्रक्रिया चालेल. या प्रक्रिया व्यवस्थित राबवा, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.





























































