
काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे गटनेते व राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी एक वर्षाचे मानधन मोफत लसीकरणाकरीता मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचे जाहीर केले आहे. तसेचर थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरमधील अमृत उद्योग समूहातील विविध सहकारी संस्थांच्या सुमारे 5 हजार कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा निधीही मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिला जाणार आहे.
बाळासाहेब थोरात यांच्यासह काँग्रेसच्या सर्व आमदारांचे एक महिन्याचे वेतनही मुख्यमंत्री सहाय्यता निधी दिले जाणार आहे. महाराष्ट्र काँग्रेस पक्षाच्या वतीने पाच लाख रुपयांचा निधीही दिला आहे. तसेच बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखालील अमृत उद्योग समूह या कोरोना संकटातही जनतेच्या मदती करता पुढे आला आहे. थोरात कारखान्याने नुकतेच 500 बेडचे कोविड केअर सेंटर सुरू केले असून एसएमबीटी या संस्थेच्या वतीने तालुक्यातील विविध रुग्णालयात व केअर सेंटरमध्ये वैद्यकीय सुविधा पुरवल्या जात आहेत.
नव्याने होणाऱ्या लसीकरणात अमृत उद्योग समूहातील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना, राजहंस दूध संघ, अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्था, श्याम्प्रो, राजहंस ट्रान्सपोर्ट कंपनी, सह्याद्री बहुजन शिक्षण संस्था, एस.एम.बी.टी सेवाभावी संस्था, हरिश्चंद्र पाणीपुरवठा फेडरेशन, गरुड कुकुटपालन, शेतकी संघ, अमृतवाहिनी बँक यासह सर्व सहकारी संस्थांमधील सुमारे पाच हजार कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा निधी हा सुद्धा मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिला जाणार आहे.



























































