
हिवाळी अधिवेशन तापले असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अचानकपणे दिल्लीला रवाना झाल्याने चर्चांना उधाण आले आहे. पुणे येथे आमदार मुक्ता टिळक यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर तिथूनच ते विमानाने दिल्लीला रवाना झाले. आता सोमवारीच अधिवेशनाला हजेरी लावायची असल्याने दोन दिवस दिल्लीत भाजपचं काय शिजणार याची चर्चा सुरू झाली आहे.
भाजप आमदार मुक्ता टिळक यांचे गुरुवारी निधन झाले. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत शोकप्रस्ताव मांडून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मुक्ता टिळक यांच्या अंत्यदर्शनासाठी देवेंद्र फडणवीस पुण्याला गेले होते. तिथे अंत्यदर्शनानंतर पुन्हा नागपूरला न परतता ते थेट दिल्लीला रवाना झाले.
फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्याबद्दल विविध अंदाज लावले जात आहेत. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाबाबत ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवा, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगूनही कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची महाराष्ट्रविरोधी वक्तव्ये सुरूच आहेत. सीमा प्रश्नाचा मुद्दा विरोधी पक्षाकडून सोमवारी विधिमंडळात आणला जाणार आहे. त्यासंदर्भात फडणवीस हे शहा यांना भेटायला दिल्लीत गेले असे म्हटले जात आहे.
उपमुख्यमंत्र्यांवर हक्कभंग
दिशा सालियनप्रकरणी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात चुकीची माहिती दिली. त्यामुळे सोमवारी त्यांच्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव आणणार असल्याचा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला.
खासदार राहुल शेवाळे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपाची एसआयटी चौकशी करण्याचे निर्देश विधान परिषद उपसभापतींनी दिले आहेत. त्यासंदर्भातही शहा यांच्याबरोबरच्या भेटीत चर्चा होऊ शकते.
हिवाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार करावा लागणार आहे. त्याबाबतही सल्लामसलत केली जाऊ शकते.
सीमा प्रश्नाचा मुद्दा विरोधी पक्षाकडून सोमवारी विधिमंडळात आणला जाणार आहे. त्यासंदर्भात फडणवीस शहा यांच्याशी चर्चा करतील, असेही सांगितले जाते.

































































