दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी शिवसेना सरसावली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

महाराष्ट्र दुष्काळाने होरपळला आहे. तीक्र पाणी टंचाईने शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रूही सुकून गेले आहेत. चारा छावण्यांवर मुक्काम करून राहिलेल्या शेतकरी कुटुंबांना अन्नधान्याची निकड निर्माण झाली आहे. दुष्काळग्रस्त जनतेच्या मदतीसाठी शिवसेना सरसावली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांची आज तातडीची बैठक बोलवून दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी धावून जाण्याचे आदेश दिले.

या बैठकीला शिवसेना नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री दिवाकर रावते व पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यासह जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, आमदार तानाजी सावंत, जयदत्त क्षीरसागर, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर आदी उपस्थित होते.

शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाचे भूमिपूजन जुलैमध्ये होणार

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या कामाच्या प्रगतीचा आढावाही या बैठकीत घेण्यात आला. स्मारकासाठी सुरू असलेली निविदा प्रकिया येत्या जुलै महिन्यात पूर्ण होईल अशी माहिती यावेळी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (एमएमआरडीए) देण्यात आली. त्यामुळे जुलै महिन्यात स्मारकाचे भूमिपूजन करून प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी, एमएमआरडीएच्या अतिरिक्त आयुक्त सोनिया सेठी, महापालिका प्रकल्प अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे, स्मारकाच्या आर्किटेक्ट आभा लांबा तसेच इतर अधिकारी व प्रकल्पाचे सल्लागार आदी उपस्थित होते.

या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर, जिल्हाधिकारी मनोज रानडे यांनी यावेळी दुष्काळी परिस्थितीची आणि सरकारने हाती घेतलेल्या तातडीच्या उपाययोजनांची माहिती दिली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी उपस्थित मंत्री आणि पदाधिकाऱ्यांना दुष्काळग्रस्तांना आवश्यक ती मदत पोहोचवण्याबाबत मार्गदर्शन केले.

चारा छावण्यांवर मुक्काम करून राहिलेल्या शेतकरी कुटुंबांना पुढील दहा दिवस पुरेल इतके अन्नधान्य व भोजन साहित्य पोहोचवण्याचे नियोजन या बैठकीत केले गेले. त्यानुसार नगर, सातारा, सोलापूर, सांगली, संभाजीनगर, पुणे, बीड, धाराशीव व जालना या जिह्यांमधील सुमारे दोन लाख शेतकऱ्यांना धान्य, स्वयंपाकासाठी लागणारे तेल, डाळी, कांदे-बटाटे आदी साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.