भाजपची यादी आज जाहीर होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने शिवसेनेसोबतच्या युतीवर रविवारी शिक्कामोर्तब केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत युतीची घोषणा झाल्यानंतर भाजप उमेदवारांची यादी सोमवारी घोषित होईल, असे भाजपच्या सूत्रांनी सांगितले.

भाजप मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाली. तब्बल पाच तास चाललेल्या या बैठकीला भाजपाध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे कार्याध्यक्ष जे.  पी. नड्डा, राष्ट्रीय संघटनमंत्री बी. एल. संतोष, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे उपस्थित होते.

युतीवर शिक्कामोर्तब

महाराष्ट्रातील निवडणूक शिवसेनेच्या साथीने लढण्याबाबत आजच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. शिवाय जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावरही या बैठकीत साधकबाधक चर्चा झाल्याचे समजते. या फॉर्म्युल्यावर उद्धव ठाकरे यांनी शिक्कामोर्तब केल्यानंतरच भाजप उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उद्या सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.