मुख्यमंत्र्यांच्या कानपिचक्या, राणेंनी संयमाचे धडे घ्यावेत!

837

नीतेश राणे हे नारायण राणे यांच्या शाळेत शिकले आहेत. त्यामुळे ते आक्रमक आहेत. मात्र राणेंनी आता संयमाचे धडे घ्यावेत, अशा कानपिचक्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवार दिल्या.

कणकवलीत आज मुख्यमंत्र्यांची प्रचार सभा झाली तेव्हा त्यांनी सिंधुदुर्गात दोन वर्षांत सी-वर्ल्ड प्रकल्प आणणार, कोकण टँकरमुक्त करणार, नव्या मंत्रिमंडळाची बैठक सिंधुदुर्गात घेणार अशी आश्वासने दिली. मात्र त्याचबरोबर नारायण राणे, नीतेश राणे आणि त्यांच्या समर्थकांचीही चांगलीच शाळा घेतली.

गेले कित्येक दिवस फक्त ‘तारीख पे तारीख’ म्हणून साजरा होणारा राणे यांच्या स्वाभिमान पक्षाच्या भाजप विलीनीकरणाचा कार्यक्रम आज अखेर कणकवलीत झाला. नीलेश राणे आणि काही पक्ष पदाधिकाऱयांनी भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला. याची घोषणा करतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छडी उगारली. ते म्हणाले, नीतेश राणे आक्रमक आहे. ते नारायण राणे यांच्या शाळेतील विद्यार्थी आहेत. मात्र आता नीतेश हे भाजपच्या शाळेत आल्याने त्यांनी संयमाचे धडे घ्यावेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नारायण राणे जिथे आक्रमक व्हायचे तिथे होतात, संयम बाळगायचा तिथे बाळगतात असे सांगत मुख्यमंत्र्यांनी भाजप प्रवेशासाठी ताटकळलेल्या राणेंच्या संयमाकडेच जणू बोट दाखवले.

पाच वर्षांचा मुलगाही सांगतो, महायुतीचेच सरकार येणार

मुख्यमंत्र्यांनी यावेळी महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचेच सरकार येणार असा विश्वास व्यक्त केला. पाच वर्षांचा शेंबडा मुलगाही महायुतीचेच सरकार येणार असे सांगतो, असेही ते यावेळी म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या