
कोरोना लसीकरणाची पूर्वतयारी म्हणून आज देशभरात ‘ड्राय रन’ अर्थात रंगीत तालीम यशस्वी झाली. महाराष्ट्रात पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, जालना, नंदुरबार येथे ‘ड्राय रन’ राबविण्यात आले. प्रत्येक ठिकाणी किमान 25 जणांनी या ‘ड्राय रन’मध्ये भाग घेतला. आरोग्य विभागाकडून लसीकरणाच्या ‘प्रोटोकाॅल’चे काटेकोर पालन करण्यात आले. दरम्यान, रंगीत तालीम तर झाली; आता प्रत्यक्षात लस कधी टोचणार याची वाट नागरिक पाहात आहेत.
2021 मध्ये लवकरच देशात लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. मात्र, मोठय़ा प्रमाणावर लसीकरण अभियान सुरू करण्यापूर्वी त्याची तयारी कशी आहे, त्यात काही त्रुटी आहेत का? आणखी काही खबरदारी घ्यावी लागणार का? याची चाचपणी करण्यासाठी ‘ड्राय रन’ म्हणजे रंगीत तालीम घेण्यात आली. कोरोनाची लस ठेवलेल्या कोल्ड स्टोरेजपासून लस टोचेपर्यंतचे प्रात्यक्षिक करण्यात आले. मात्र, लस प्रत्यक्षात टोचण्यात आलेली नाही.
औंध रुग्णालयात 25 कर्मचाऱयांचा सहभाग
औंध येथील जिल्हा रुग्णालयात झालेल्या ‘ड्राय रन’साठी 25 लाभाथी कर्मचाऱयांची निवड करण्यात आली होती. त्यांना लसीकरणाच्या ठिकाणी बसवून लसीकरण सत्राची रंगीत तालीम घेण्यात आली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापुरकर, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य संपर्क) डॉ. संतोष देशपांडे, शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे, शल्यचिकित्सक डॉ. प्रकाश रोकडे, जनरल सर्जन डॉ. नितीन बिलोलीकर उपस्थित होते.
‘CoWin’ वर नोंदणी करणे बंधनकारक
वेटिंग रूममध्ये ‘CoWin’ या अॅपवर रजिस्टर असलेल्या लाभार्थ्यांची यादी असणार आहे व त्या यादीमध्ये नाव असणाऱया लाभार्थ्यांनाच वेटिंग रूममध्ये प्रवेश दिला जाणार आहे, असे जनरल सर्जन डॉ. नितीन बिलोलीकर यांनी सांगितले.
लसीनंतर राहावे लागणार डॉक्टरांच्या निगराणीखाली
लस दिल्यानंतर लाभार्थ्यांस 30 मिनिटांसाठी निरीक्षण रूममध्ये डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात येणार असून, त्यानंतर त्यांची तपासणी करून त्यांना घरी सोडण्यात येणार आहे.
पिंपरी-चिंचवड आणि माणमध्ये झाली ‘ड्राय रन’
पिंपरी-चिंचवड शहरातील जिजामाता रुग्णालय आणि माण येथील ग्रामीण रुग्णालयात आज सकाळी नऊ ते अकराच्या दरम्यान ही ‘ड्राय रन’ पार पडली. ‘ड्राय रन’ घेतली गेली त्या आरोग्य कर्मचाऱयांची जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच कोरोना लसीकरणासाठी तयार केलेल्या वेबसाईटवर नोंदणी केलेली होती. त्यांची मुलाखत घेण्यात आली. नंतर लसीकरण असलेल्या ठिकाणी बसवून त्यांची विचारपूस करत काय अडचणी येतात याविषयी आढावा घेण्यात आला. दरम्यान, लस दिल्यानंतर त्या व्यक्तीला अर्धा तास डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवले जाते. ही सर्व प्रक्रिया आज केवळ ‘ड्राय रन’ म्हणून पार पडली आहे.
जिजामाता रुग्णालयामध्ये अतिरिक्त आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. पवन साळवे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता तिरूमणी, डॉ. बाळासाहेब होडगर आणि महिला वैद्यकिय अधिकारी डॉ. वर्षा डांगे आदी उपस्थित होते.
लसीकरणास नकार दिल्यानंतरचेही प्रात्यक्षिक
शासन मार्गदर्शक सूचनांनुसार या ‘ड्राय रन’मध्ये 29 लाभार्थींना लसीकरणासाठी निवडण्यात आलेले होते. त्यामधील 28 लाभार्थांवर लस देण्याची रंगीत तालीम करण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात लस टोचण्यात आलेली नाही. एका लाभार्थीने ‘ड्राय रन’साठी नकार दर्शविला. याचेही प्रात्यक्षिक या वेळी घेण्यात आले.
तीन कक्षांत प्रक्रिया
लसीकरणाच्या ठिकाणी वीज, इंटरनेट, सुरक्षा या सोबत प्रतीक्षा कक्ष, लसीकरण कक्ष आणि निरीक्षण कक्ष असे तीन कक्ष तयार करण्यात आले होते.
लस घ्या, गोड गोड बोला!
हिंदुस्थानात कोरोना लसीकरण मोहीम 14 जानेवारी अर्थात मकर संक्रांतीपासून सुरू होईल असे सांगण्यात येते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूर येथील कार्यक्रमात आज तशी घोषणाच केली. तर येत्या 10 ते 14 दिवसांत लसीकरण मोहीम सुरू करण्यासाठी आम्ही तयार आहोत, असे ‘एम्स’चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले. जास्तीत जास्त लसी उपलब्ध व्हाव्यात यासाठी सुरुवातीला लसीकरण मोहीम अत्यंत धिम्या गतीने राबवली जाईल असे ते म्हणाले.

































































