पूरग्रस्तांसाठी शिवसेनेचे सेवाकार्य अखंड सुरूच, चिपळूण-खेडसाठी दिंडोशीतून मदतीची पाचवी फेरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अतिवृष्टीमुळे कोकणात झालेल्या नुकसानीनंतर तेथील जनतेला उभे करण्यासाठी शिवसेनेचे मदतकार्य सुरूच आहे. दिंडोशी विधानसभेतून शिवसेना नेते-खासदार गजानन कीर्तिकर यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार सुनील प्रभू यांनी तेथील घराघरात मदत पोहोचविली असून मदतीची पाचवी फेरी चिपळूण-खेडमध्ये पोहोचत आहे.

कोकणातील आपत्तीग्रस्त भागात रोगराई पसरू नये, तेथील नागरिकांच्या ओरोग्याची काळजी घेण्यासाठी त्यांना शिवसेनेच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत केली जात आहे. माता-भगिनींना साडय़ा, गाऊन तसेच लहान मुलांना व ज्येष्ठ नागरिकांना सर्दीचा त्रास होऊ नये याकरिता लहान मुलांसाठी नवीन कपडे व वयोवृद्धांसाठी उबदार अंथरुणाकरिता चादरी तसेच महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन्सची मदत अशी जीवनावश्यक मदत सामग्री पाठविण्यात येत आहे. शिवसैनिक डॉ. हेमचंद्र मंगेश सामंत यांनी आमदार सुनील प्रभू यांच्याकडे सदरहू सामग्री सुपूर्द केली. या वस्तू कोकणातील गावांमध्ये शिवसेना सचिव-खासदार विनायक राऊत यांनी तयार केलेल्या पॅम्पमध्ये रवाना करण्यात येतील, अशी माहिती आमदार सुनील प्रभू यांनी दिली. आमदार सुनील प्रभू यांच्या माध्यमातून ताट, तांब्या, वाटी, कढई, टोप, पेले, चमचे अशा जेवण बनविण्यासाठी अत्यावश्यक भांडय़ांचा सेट देण्यात येत असून शिवसेना दिंडोशी विधानसभा क्षेत्राच्या माध्यमातून साडय़ा, टॉवेल, सॅनिटरी नॅपकिन, गाऊन, चादरी, ब्लँकेट व सहा टन गव्हाचे पीठ अशा जीवनावश्यक किटचे घराघरात वाटप केले जाणार आहे.

यावेळी उपमहापौर अॅड. सुहास वाडकर, विधानसभा संघटक प्रशांत कदम, विष्णू सावंत, उपविभागप्रमुख सुनील गुजर, प्रदीप निकम, गणपत वारिसे, भाई परब, नगरसेवक तुळशीराम शिंदे, आत्माराम चाचे, युवासेना कार्यकारी सदस्य अंकित प्रभू, ज्येष्ठ शिवसैनिक व स्टेट कमिटी ऑफ एआयबीआरएफ, महाराष्ट्र विंगचे उपाध्यक्ष प्रमोद देसाई यांच्यासह शाखाप्रमुख उपस्थित होते.

महाड, खेड, चिपळूण परिसर अतिवृष्टी आणि पुरामुळे उद्ध्वस्त झाला आहे. त्याची दखल घेत नवीन पनवेल येथील शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडीच्या वतीने अन्नपदार्थ, कपडे, चादरी, भांडी, औषधे आदी वस्तूंचे चिपळूण येथील खेर्डी, सती, मजरेकाशी गाव, पेढे आणि आसपासच्या वाडय़ावस्त्यांवर वाटप करण्यात आले. यावेळी खासदार विनायक राऊत, उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत, नवीन पनवेल येथील शिवसेनेच्या महिला शहर संघटक अपूर्वा प्रभू, विभाग संघटक संजय गोवेकर, उपविभागप्रमुख राजेश वायंगणकर, युवासेनेचे कैलास कांदळकर, शाखाप्रमुख विश्वनाथ गुरव आदी उपस्थित होते.

‘आम्ही गिरगांवकर’ टीमच्या वतीने महाड, चिपळूण, कोयना या पूरग्रस्तबाधित दुर्गम गावांत राहणाऱया बांधवांना सॅनिटरी पॅड, पाणी, पाच दिवस पुरेल इतकी धान्यसामग्री साधारण 200 कुटुंबांना देण्यात आले. तसेच भांडी, तेल, साबण, टूथपेस्ट, टूथब्रश व इतर जीवनावश्यक वस्तूंचे ग्रामस्थांना वाटप करण्यात आले.

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या वतीने कोल्हापूर जिह्यातील हातकणंगले येथील हालोंडी गावातील नागरिकांना स्वच्छतेसाठी आवश्यक सामग्री, तसेच गव्हाचे पीठ, बिस्किटे आदी सामग्री कोल्हापूर येथे पाठविण्यात आली. शिवसेना सचिव–खासदार अनिल देसाई यांच्या हस्ते सामग्री भरलेल्या टेम्पोला भगवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले. याप्रसंगी स्थायी समिती सदस्य विजय मालणकर, अशोक शेंडे, राजू पाटील, निखिल सावंत, देविदास माडये, वनिता पटेल, राजेश कुचिक उपस्थित होते.

शिवसेना विभागप्रमुख-परिवहनमंत्री अॅड. अनिल परब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना वांद्रे पश्चिम विधानसभा संघटक बाळकृष्ण चव्हाण यांच्या वतीने महाड-पोलादपूर येथील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी माजी नगरसेविका गीता चव्हाण, ममता चव्हाण, उपशाखाप्रमुख उपेंद्र लोकेगावकर, सत्यम शिंदे, प्रमोद कदम व इतर शिवसैनिक उपस्थित होते.