
राज्यावर एखादी नैसर्गिक आपत्ती आल्यावर मुख्यंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांचे दौरे हे त्या भागातील लोकांना धीर देण्यासाठी उपयोगी असतात. पण इतरांनी पूरग्रस्त भागात दौरे करून मदत आणि पुनर्वसन करणाऱयांचे लक्ष विचलित करू नये, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज पूर पर्यटन करणाऱयांना झापले. मात्र ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्यांनी दौरे करून कामात सुसूत्रतेवर लक्ष दिले पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले.
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पूरग्रस्त भागातील अनावश्यक लोकांच्या दौऱयावर नाराजी दर्शवली. आपण स्वतःही पूरग्रस्त भागाच्या दौऱयावर अद्यापर्यंत गेलो नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावर त्यांची भूमिका अधिक स्पष्ट करताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांची त्या भागात दौरे करण्याची जबाबदारी आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱयांचे स्वागत करतो. पण माझ्यासारखे लोक गेले तर तेथील शासकीय यंत्रणेवर ताण पडतो. पुनर्वसनाच्या कामावरून अधिकाऱयांचे लक्ष विचलित होते. माझ्यासारख्या इतर नेत्यांनी दौरे करणे टाळायले हवे, असे आवाहन शरद पवार यांनी यावेळी केले.
राज्यपाल केंद्राकडून मदत मिळवतील
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा केला. त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, पूरग्रस्तांना उभे करण्यासाठी केंद्राकडून अधिक मदत मिळवण्यासाठी ते प्रयत्न करतील, असा मला विश्वास आहे.
नरसिंह राव यांनी दौरा पुढे ढकलला होता
शरद पवार यांनी लातूर भूंकप पुनर्वसन कार्याची आठवण करून दिली. लातूर भूंकपाच्यावेळी पंतप्रधान नरसिंह राव यांना लातूरचा दौरा करायचा होता. मात्र मी त्यांना दहा दिवस न येण्याची विनंती केली. तुम्ही आलात तर सर्व यंत्रणा तुमच्यासाठी कामाला लागेल, असे सांगितले. माझे ऐकून नरसिंह राव हे दहा दिवसांनी दौऱयावर आले होते, अशी आठवण सांगितली.
फडणवीस यांची सहमती
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भूमिकेशी आपण सहमत असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. पण आम्ही विरोधी पक्षनेते असल्यामुळे आमच्यामागे फारशी यंत्रणा नसते. त्यामुळे आम्ही दौरे करणार असेही ते म्हणाले. विरोधी पक्षाने दौरे केल्यावर बऱयाच वेळा सरकारी यंत्रणा जागी होऊन कामाला लागते, असेही ते म्हणाले.
दौऱयावर येणाऱयांना ‘नोडल अधिकारी’ देणार माहिती
महापुराच्या संकटात अनेक नेतेमंडळी दौऱयावर येतात. अशावेळी जिल्हाधिकारी, सीईओ यांना काम करण्यात अडचणी येतात. हे लक्षात घेऊन दौऱयावर येणाऱयांना माहिती देण्यासाठी ‘नोडल अधिकारी’ नेमण्यात येतील. अन्य अधिकारी कामात राहतील. राज्यपालांनी राजशिष्टाचारानुसार दौऱयात कोणाला सोबत घ्यायचे हा त्यांचा निर्णय आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.





























































