मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक वातावरण; 12 जूनपर्यंत राज्यात पावसाचे आगमन होणार

राज्यात ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. या अवकाळी पावसाने वातावरणात थोडा गारवा निर्माण झाल्याने तापमान खाली आले आहे. त्यामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे. त्यातच आता मॉन्सून लवकरच येणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. मॉन्सून अंदमानात 19 मे रोजी दाखल होत असल्याचे हवामान खात्याने जाहीर केले होते. आता मॉन्सून राज्यात कधी येणार, याबाबतही हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे.

हवामान खात्याने मॉन्सूनच्या आगमनाचे संकेत देत पाऊस अंदमानात 19 मे रोजी दाखल होणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, मॉन्सून केरळ आणि महाराष्ट्रात कधी येणार याबाबत अंदाज व्यक्त केले नव्हते. मात्र, आता बंगालचा उपसागर आणि केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हे वातावरण मॉन्सूनच्या पुढील प्रवासासाठी पोषक असल्याने केरळमध्ये दाखल झाल्यानंतर मॉन्सूनची आगेकूच वेगाने होणार आहे. त्यामुळे दरवर्षीपेक्षा महाराष्ट्रात मॉन्सूनचे आगमन लवकर होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

दरवर्षी 21 मे रोजी मॉन्सून अंदमानात दाखल होतो. यंदा तो 2 दिवस आधीच येत आहे. त्यामुळे केरळातही तो 10 दिवसात म्हणजे 29 मेपर्यंत दाखल होणार आहे. त्यानंतर पुढील 10 ते 12 दिवसात त्याचे महाराष्ट्रात आगमन होईल. यावर्षी 10 ते 12 जूनपर्यंत मॉन्सून महाराष्ट्रात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, मॉन्सून केरळात आणि बंगालच्या उपसागरात दाखल झाल्यानंतर त्याची पुढची दिशा आणि वाटचाल ठरणार आहे. त्यामुळे जून महिन्याच्या सुरुवातील पावसाच्या आमगनाबाबत निश्चित माहिती मिळेल, असेही हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.