‘आनंदाचा शिधा ‘आधा’च, गुढीपाडवा होऊनही अनेक तालुक्यांमध्ये एक कणही पोहोचला नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मिंधे सरकारने गुढीपाडव्यानिमित्त जाहीर केलेल्या ‘आनंदाचा शिधा’चे वांदे झाले आहेत. गुढीपाडवा होऊन गेला तरी अजून जिल्ह्यात आनंदाचा शिधाचे धान्य पोहोचलेले नाही. काही ठिकाणी आनंदाचा शिधा ‘आधा’च पोहोचला आहे. हा आनंदाचा शिधा येणार कधी आणि शिधापत्रिका धारकांना वाटणार केव्हा हा प्रश्न जिल्हा पुरवठा विभागाला पडला आहे.

मंडणगड, खेड, गुहागर, लांजा आणि राजापूर तालुक्यामध्ये आनंदाचा शिध्याची एकही वस्तू पोहोचलेली नाही. दिवाळीप्रमाणेच गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने राज्यसरकारने आनंदाचा शिधा वाटप करण्याचा निर्णय घेतला. शंभर रुपयांमध्ये 1 किलो रवा, 1 किलो चणाडाळ, 1 किलो साखर, 1 लीटर पामतेल दिले जाणार होते. आनंदाचा शिधा गुढीपाडव्याला मिळेल अशी गोरगरीब जनतेला अपेक्षा होती. पण मिंधे सरकार गोरगरीबांचा गुढीपाडवा गोड करू शकले नाहीत. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्यात चार वस्तूंपैकी एकही वस्तू प्राप्त झालेली नाही. मंडणगड, खेड, गुहागर, संगमेश्वर, राजापूर, लांजा या तालुक्यात रवा, साखर, चणाडाळ, पामतेलापैकी एकही वस्तू अद्यापपर्यंत पोहोचलेली नाही. दापोली तालुक्यात पामतेलाची 28 हजार 73 पाकिटे अपेक्षित असताना 21 हजार 220 पाकिटे पोहोचली आहेत. चिपळूण तालुक्यामध्ये 40 हजार 331 पाकिटे अपेक्षित असताना रव्याची 30 हजार आणि चणाडाळीची 30 हजार पाकिटे पोहोचली आहेत. बाकी एकही वस्तू पोहोचलेलो नाही. देवरुखमध्ये 15 हजार 583 पाकिटे अपेक्षित असताना रव्याची 9 हजार 600, साखरेची 15 हजार 583 नाणि पामतेलाच्या 13 हजार 170 पिशव्या पोहोचल्या आहेत. पण देवसखात अद्याप चणाडाळ पोहोचलेली नाही. रत्नागिरी तालुक्यामध्ये 40 हजार 161 पाकिटे अपेक्षित असताना रव्याची 30 हजार, साखरेची 25 हजार 50, पामतेलाच्या 40 हजार 61 पिशव्या पोहोचल्या आहेत. रत्नागिरीतही चणाडाळ पोहोचलेली नाही. पाली आणि जयगड येथील रेशनदुकानांवर एकही वस्तू पोहोचलेली नाही. लांजामध्ये 17 हजार 358 पाकिटे अपेक्षित असताना एकही वस्तू पोहोचलेली नाही. राजापूर तालुक्यामध्ये 27 हजार 39 पाकिटे अपेक्षित असताना एकही वस्तू पोहोचलेली नाही. जिल्ह्यामध्ये आनंदाचा शिधाची 2 लाख 58 हजार 482 पाकिटे अपेक्षित असताना रव्याची 69 हजार 600 साखरेची 40 हजार 633, चणाडाळीची 30 हजार आणि पामतेलाच्या 74 हजार 551 पिशव्या प्राप्त झाल्या आहेत. आज काही तालुक्यांमध्ये काही प्रमाणात धान्य आल्याची माहिती मिळाली आहे.

आनंदाचा शिधाच्या पिशव्यांचा पत्ताच नाही
आनंदाचा शिधामधील चार वस्तू भरून देण्यासाठी पिशवी दिली जाते. अद्याप आनंदाचा शिधाच्या पिशव्या प्राप्त झालेल्या नाहीत. तसेच चणाडाळ फक्त चिपळूण तालुक्याला मिळाली आहे. इतर तालुक्यांना चणाडाळीची प्रतिक्षाच आहे. साखर देवरूख आणि रत्नागिरीमध्येच मिळाली आहे. पामतेलाच्या पिशव्या दापोली, रत्नागिरी आणि देवरुखमध्येच मिळाल्या आहेत तर रवा चिपळूण, देवरुख आणि रत्नागिरीमध्येच मिळाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शिधापत्रिकाधारकांना हा आनंदाचा शिधा पोहोचणार कधी हा प्रश्न निर्माण झाला आहे.