
आठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश आज गृह विभागाने जारी केले. रेल्वे पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांना राज्य गुप्तवार्ता विभागाचे विशेष महानिरीक्षक तर राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्त शारदा निकम यांना अमली पदार्थविरोधी टास्क फोर्सच्या विशेष महानिरीक्षक बनवण्यात आले आहे.
नागपूरचे सह-आयुक्त निस्सार तांबोळी यांना नागपूरच्याच राज्य राखीव पोलीस दलाच्या विशेष महानिरीक्षकपदी पाठवण्यात आले आहे. अमरावतीचे पोलीस आयुक्त एन. डी. रेड्डी यांना नागपूर शहराचे सह-आयुक्त बनवण्यात आले आहे. केंद्रीय प्रतिनियुक्तीवरून आलेल्या सुप्रिया पाटील-यादव यांच्याकडे महाराष्ट्र राज्य पोलीस आस्थापना विभागाचे विशेष महानिरीक्षक पद सोपवण्यात आले आहे. राज्य राखीव पोलीस दलाचे विशेष महानिरीक्षक राजीव जैन यांच्याकडे आता सागरी सुरक्षा विभागाच्या विशेष महानिरीक्षकपदाची जबाबदारी असणार आहे. मुंबईचे अपर पोलीस आयुक्त अभिषेक त्रिमुखे यांची बदली पोलीस प्रशासन विभागात विशेष महानिरीक्षक म्हणून करण्यात आली आहे. आयपीएस अधिकारी आरती सिंह यांचीही बदली करण्यात आली असून त्यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहेत.