सरकारी अधिकाऱयांच्या परदेश दौऱ्यांंना चाप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्याच्या सेवेतील सर्व अधिकाऱयांच्या परदेश दौऱयांना सरकारने चाप लावला आहे. लाखो रुपये खर्च करून अधिकारी वर्ग परदेश दौरे करतात पण त्याचा सरकारला अनेकदा फायदा होत नाही. त्यामुळे राज्याची प्रगती व विकासाच्या दृष्टीने फायदेशीर ठरणाऱया विदेश दौऱयांना यापुढे परवानगी मिळणार आहे.

राज्यातील सनदी अधिकारी तसेच राज्य सेवेतील, सार्वजनिक उपक्रम, मंडळे, महामंडळांमधील अधिकारी, पदाधिकारी आणि कर्मचाऱयांच्या विदेश दौऱयांवर निर्बंध घालण्याचा निर्णय राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने घेतला आहे.

व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून

सर्वसाधारण स्वरुपाची माहिती मिळवण्यासाठी विदेश अभ्यास दौरे आता करता येणार नाहीत. सेवानिवृत्तीच्या उंबरठय़ावर असलेल्या अधिकाऱयांचा विदेश दौऱयांसाठी विचार होणार नाही. विदेश दौऱयातून मिळणारी माहिती इतर माध्यमातून घ्यावी किंवा विदेश दौरा न करता व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सहभागी होता येईल याची शक्यता पडताळून पाहण्यात येईल. एका आर्थिक वर्षात तीन विदेश दौऱयांना परवानगी मिळेल आणि पंधरा दिवसांपेक्षा अधिक काळासाठी परदेश दौरा करता येणार नाही.

विदेश दौऱयासाठी समिती

विदेश दौऱयाची आवश्यकता तपासण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली दोन जणांची समिती नेमण्याचा निर्णय सामान्य प्रशासन विभागाने घेतला आहे.

हितसंबंधांचा संघर्ष नको

राज्य सरकारला लक्षणीयदृष्टय़ा फायदेशीर ठरणाऱया किंवा टाळता येणे शक्य नसलेल्या दौऱयांचेच प्रस्ताव विचारात घेण्याच्या स्पष्ट सूचना सामान्य प्रशासन विभागाने दिल्या आहेत. मुख्य म्हणजे विदेश दौऱयामुळे अधिकाऱयांच्या हितसंबंधांचा संघर्ष उद्भवणार नाही याची विभागाच्या सचिवांनी खातरजमा करणे आवश्यक आहे, असेही स्पष्टपणे नमूद केले आहे. संशयास्पद सचोटी असलेल्या अधिकाऱयांच्या यादीत नाव समाविष्ट असणारे अधिकारी व कर्मचाऱयांना विदेश दौऱयावर पाठवले जाणार नाही. त्याशिवाय गंभीर वर्तवणुकीसाठी शिस्तभंगाची कारवाई सुरू असणारे अधिकारी तसेच न्यायालयात खटला सुरू असलेल्यांचा विदेश दौऱयासाठी विचार करू नये असेही नमूद केले आहे. लाचखोरी, अपसंपदा, नैतिक अधःपतन, बलात्कार, खून, खुनाचा प्रयत्न, अपहार अशा गंभीर प्रकरणातील अधिकारी-कर्मचारी विदेश दौऱयांना मुकणार आहेत.