राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील डॉक्टर्सचे आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांतील वैद्यकीय अधिकाऱयांनी आपल्या विविध मागण्यांसाठी 7 एप्रिलपासून काळ्या फिती लावून काम सुरू केले आहे. शासनाने तातडीने मागण्या मान्य न केल्यास राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत 15 एप्रिल रोजी 24 तास काम बंद आंदोलन पुकारण्याचा इशारा डॉक्टरांच्या संघटनेने दिला आहे. वैद्यकीय महाविद्यालय वैद्यकीय अधिकारी संघटनेने याबाबत राज्य सरकारला सविस्तर निवेदन पाठवले आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी हे महत्त्वाचे पद असते. हे डॉक्टर्स कोरोना काळात एकही दिवसाची सुट्टी न घेता किंवा क्वारंटाइन लिवही न घेता सलग 24 तास काम करत आहेत. शासकीय रुग्णालयांतील सर्वच महत्त्वाच्या जबाबदाऱया या डॉक्टर्सना पार पाडाव्या लागत आहेत. त्यातील अनेकांना कोरोनाची लागणही झाली, मात्र उपचार घेऊन असे डॉक्टर्स तत्काळ रुजूही झाले आहेत. गव्हर्न्मेंट मेडिकल कॉलेजमधील वैद्यकीय अधिकाऱयांना कायमस्वरूपी करण्यात यावे व त्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा या त्यांच्या मागण्या आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी डॉक्टरांनी 7 एप्रिलपासून काळ्या फिती लावून काम सुरू केले आहे. 15 एप्रिल रोजी 24 तासांसाठी काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. 15 एप्रिल रोजी मुंबईतील जे. जे. रुग्णालय येथे संघटनेकडून आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यभरातील शासकीय रुग्णालयांतही हे आंदोलन करण्यात येणार आहे.

…तरीही सरकारने मागण्या मान्य न केल्यास नाइलाजाने 22 एप्रिलपासून बेमुदत काम बंद आंदोलन करावे लागेल असा इशारा वैद्यकीय महाविद्यालय वैद्यकीय अधिकारी संघटना महाराष्ट्रने दिला आहे. हे काम बंद आंदोलन करताना आम्हाला कुठल्याही रुग्णाला किंवा प्रशासनाला वेठीला धरायचे नसून आमच्या मागण्यांची सातत्याने होणारी हेळसांड पाहूनच हे पाऊल अतिशय नैराश्यातून आम्हाला उचलावे लागत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.