
मागच्या वर्षांत विरोधकांच्या कुंडल्या बघणारे आणि गेल्या वर्षभरात सरकार पाडण्याचा मुहूर्त पाहणारे आता पुस्तके आणि अहवाल वाचू लागले आहेत, असा सणसणीत टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला, तेव्हा विधानसभागृहात जोरदार हास्यकल्लोळ उडाला. हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांच्या पार ठिकऱ्या उडवत जोरदार, तडाखेबंद प्रत्युत्तर दिले. तुमच्यासारखे विकृत राजकारण आम्ही करत नाही, असेही त्यांनी विरोधकांना सुनावले.
पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो कारशेड, अर्णब गोस्वामी, मराठा आरक्षण या मुद्दय़ांवरून सरकारवर टीका केली. या टीकेला, आरोपांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सणसणीत प्रत्युत्तर दिले.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रात सरकारविरोधात काही बोलले तर तुरुंगात टाकले जाते. महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी आहे, असा आरोप आमच्यावर झाला. मग ईडी आणि इतर तपास यंत्रणांचा वापर तुम्ही कसा करत आहात? तुमच्या आवडीचा जो असेल त्याच्या विरोधात हक्कभंग आणला की त्याच्या मागे ईडी लावणार का? प्रताप सरनाईकांच्या मागे ईडीचा ससेमिरा लावला. त्यांच्या मुलांचीही चौकशी केली. नशीब, त्यांना नातू झालेला नाही. नाहीतर त्याच्याही मागे ईडी चौकशी लावली असती किंवा उद्या सांगतीलही की, प्रताप सरनाईकांना नातू झाला तर आधी इथे घेऊन या (जोरदार हंशा) हे सगळे काय आहे? ही विकृतीच आहे. असे विकृत राजकारण आम्ही करत नाही. या राजकारणाला महाराष्ट्रात थारा नाही. कुणी ईडी, सीबीआयची अबू चव्हाटय़ावर मांडण्याचे काम करत असेल, देशात आदर असलेल्या या संस्थांना घरच्या नोकरांसारखे वापरले जात असेल आणि त्याचा वापर जर आमच्याविरोधात केला जात असेल तर ते सहन करू शकत नाही. कोणीही उठावे आणि टपली मारून जावे हे आता होणार नाही, असा सज्जड इशाराच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील भाजप सरकारला दिला.
आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही
येत्या काही वर्षांमध्ये प्राचीन मंदिरांच्या संवर्धनासाठीही काम केले जाईल आणि त्यासाठी विशेष निधी उपलब्ध करून देऊ, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. मात्र ही घोषणा करतानाच तुमच्या आता हे लक्षात येईल की, आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी भाजपला पुन्हा रट्टा हाणला.
जे जे महाराष्ट्रात आहे त्याची मालकी महाराष्ट्राचीच
मेट्रो कारशेडबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोर्टाचा मुद्दा उपस्थित केला होता. यावर प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, तुम्ही सौनिक समितीचा रिपोर्ट दाखवला, कोर्टाचा मुद्दा काढला. तसा आमच्याकडेही कांजुरमार्गच्या जागेविषयीचा पत्रव्यवहार तसेच सह्यांचे कागद आहेत. हा विषय कोर्टामध्ये अॅडमिट आहे किंवा नाही ते न्यायालयाला ठरवू द्या. कारण एखादा रुग्ण दवाखान्यात गेला की त्याला अॅडमिट करून घ्यायचं की नाही हे डॉक्टरला ठरवू द्या. त्यानुसार न्यायालयात जो काय निकाल लागायचा तो लागेल. पण जनतेच्या हिताचे असे जे प्रोजेक्ट आहेत त्यामध्ये तुझं माझं अशी खेचाखेची करू नका. त्यात कोर्टाने असेही मत नोंदवले आहे की, मालकी कोणाची यापेक्षा प्रोजेक्ट कशासाठी आहे हे महत्त्वाचे आहे. मालकी राज्याची आहे का, तर आहेच. जे जे महाराष्ट्रात आहे त्याची पहिली मालकी महाराष्ट्राचीच आहे, असे मुख्यमंत्र्यांनी ठणकावले.
देवेंद्रजी, आपण दिल्लीत जायला हवं
शेतकऱयांच्या विषयाबाबत बोललात. सगळे सांगताहेत देवेंद्रजी, आपण दिल्लीत जायला पाहिजे. खासकरून मुनगंटीवारांची इच्छा आहे. देवेंद्रजी दिल्लीत जायला हवेत. कारण ते देशाचा विचार करतात. मोठा विचार करतात, असा टोलाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला.
राज्याला मातीत घालण्याचे राजकारण थांबवा
आम्ही सत्तेत आहोत, तुम्ही विरोधात आहात. त्यामुळे राज्याच्या हिताच्या आड आपलं राजकारण येता कामा नये. तुम्ही राज्याचे द्रोही नाहीत. तेव्हा विरोधाला विरोध करायचा म्हणून प्रत्येक गोष्टीत आम्हाला अडवत बसायचं… तुम्ही आम्हाला अडवायचं, आम्ही तुम्हाला अडवायचं. असं राज्याला मातीत घालायचं राजकारण थांबवावं लागेल, अशा शब्दांत विरोधकांना खडसावताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईकरांच्या हितामध्ये मिठागराचा खडा टाकू नका, अशी समजच मेट्रो कारशेडवरून राजकारण करणाऱयांना दिली. मुख्यमंत्री म्हणाले, आरे कारशेडची जागा कांजुरमार्गला नेल्यानंतर त्याचे फायदे किती होणार हे आपल्याला भविष्यात कळणारच आहे. पण पर्यावरण जसंच्या तसं ठेवून विकास होणार असेल तर त्याला हे सरकार प्राधान्य देईल. त्यामुळे यातून समजुतीने यावर मार्ग काढून काही ठिकाणी तुमच्या सूचना मानत आहोत. कारण तुम्ही राज्याचे द्रोही नाहीत. तेव्हा केवळ विरोधाला विरोध करू नका.
बुलेट ट्रेनची जागा केंद्राला कुणी दिली?
प्रोजेक्ट म्हटला की आक्षेप होतोच. समृद्धी महामार्गावेळी आक्षेप घेतले, पण त्यातून मार्ग काढलाच. तिकडे वाढवण बंदराला स्थानिकांचा विरोध असतानाही केंद्र तो लादत आहेच. बुलेट ट्रेनची मागणी कुणासाठी आहे? मुंबईसाठी आहे का? ऐन मोक्याची जागा बुलेट ट्रेनसाठी दिली. या जागेचा वापर महाराष्ट्राच्या हितासाठी करता आला असता. पण ती जागा कुणी दिली? कुणी मागितली होती? आपल्याला किती स्टेशन मिळणार… केवळ 4. मुंबईची जागा आहे. मी इकडेच करतो कारशेड असे म्हणू शकतो. तेव्हा मेट्रो कारशेडबाबत उगाच मुंबईकरांच्या हिताच्या आड मिठागराचा खडा टाकू नका, असा इशाराच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना दिला.
डब्ल्यूएचओ आणि वॉशिंग्टन पोस्टला जे दिसले ते दुर्दैवाने तुम्हाला नाही दिसले
कोरोनावरून टीका करणाऱया विरोधकांचाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला. राज्याने एकही आकडेवारी पहिल्या दिवसापासून लपवलेली नाही. विरोधकांनी टीका जरूर करावी, पण आपल्या धारावी मॉडेलचे काैतुक जगाने केले. ‘डब्ल्यूएचओ’ आणि ‘वॉशिंग्टन पोस्ट’ला जे दिसले ते दुर्दैवाने तुम्हाला नाही दिसले. डॉक्टरांचा टास्क फोर्स निर्माण करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे आणि ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही योजनाही महाराष्ट्राने पहिल्यांदा राबवली. आपण 17 दिवसांत फिल्ड हॉस्पिटल उभे केले याचे काैतुक का नाही, असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. पंतप्रधानांनी कोरोना लसीबाबत प्रेझेंटेशन दिलं, पण लस कधी येणार? कुठे येणार? हे समजले नाही, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

































































