
राज्यातील तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी आज तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समिती बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सहा तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी 993 कोटी 72 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. यामुळे संबंधित तीर्थक्षेत्रांचा कायापालट होणार असून भाविक, पर्यटकांना चांगल्या सुविधा मिळणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर आदर्श गाव विकासासाठी 172 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. संत तुकाराम महाराज यांचे देहू येथील जन्मस्थान, वैकुंठगमन मंदिर परिसर तसेच भंडारा डोंगर परिसराच्या संवर्धन आणि विकासासाठी 41 कोटींची तरतूद करण्यात आली. संगम माहुली समाधीस्थळ संवर्धनासाठी 133 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याअंतर्गत महाराणी ताराबाई, महाराणी येसूबाई आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्थळांचा जीर्णोद्धार आणि लँडस्केप विकास केला जाणार आहे.सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक किल्ले अजिंक्यताराचे जतन, संवर्धन आणि परिसर सुशोभीकरणासाठी 134.80 कोटी रुपयांचा विकास आराखडा आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरुळ येथील घृष्णेश्वर ज्योतार्ंलग मंदिराच्या विकासासाठी सुधारित आराखडा तयार केला आहे. या प्रकल्पाची एकूण किंमत आता 210.45 कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत. श्री क्षेत्र परळी वैजनाथ ज्योतार्लिंग मंदिर परिसर मूळ आराखड्यातील पुढील नवीन कामांसाठी सुमारे 301.54 कोटी रुपयांचा अतिरिक्त आराखडाही तयार करण्यात आला आहे.


























































