
राज्यातील पाचवी आणि आठवी इयत्तांसह चौथी आणि सातवी या इयत्तांसाठीही यंदा शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला. त्यानुसार चौथी आणि सातवीच्या परीक्षांसाठीचा अभ्यासक्रम राज्य परीक्षा परिषदेने जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमानुसार परीक्षेची तयारी करावी लागणार आहे.
2016-17 पासून ही परीक्षा पाचवी आणि आठवी या वर्गासाठी लागू करण्यात आली. तेव्हापासून परीक्षा देणाऱया विद्यार्थ्यांच्या संख्येत घट झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे शिक्षण विभागाने पूर्वीप्रमाणेच चौथी आणि सातवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा लागू करण्याचा निर्णय घेतला. या परीक्षेचा अभ्यासक्रम जाहीर होण्याची प्रतीक्षा होती. आज राज्य परीक्षा परिषदेने परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम संकेतस्थळावर जाहीर केला आहे. चौथी आणि सातवीच्या परीक्षेत गणित, बुद्धिमत्ता चाचणी, प्रथम भाषा, इंग्रजी (तृतीय भाषा) या विषयांचा समावेश आहे.
























































