
‘खेलो इंडिया’ युवा स्पर्धेत बुधवारी महाराष्ट्राच्या संघाने 2 सुवर्ण, 3 रौप्य व 5 कास्य अशी एकूण 10 पदके पटकावली. कुस्ती, ऍथलेटिक्स, मल्लखांब, जलतरण, वेटलिफ्टिंगमधील पदकांचा यात समावेश आहे. ताऊ देवीलाल स्टेडियमसह संपूर्ण क्रीडा वर्तुळाच्या नजरा महाराष्ट्राच्या कामगिरीवर लागल्या आहेत. महाराष्ट्र आणि हरयाणात पहिल्या क्रमांकासाठी चढाओढ आहे. महाराष्ट्राला उद्या होणाऱ्या जलतरण, मल्लखांब, ऍथलेटिक्समधील पदकांची आशा आहे.
नंबर वनसाठी चढाओढ
चौथ्या ‘खेलो इंडिया’ स्पर्धेत प्रथम क्रमांसाठी हरयाणा आणि महाराष्ट्रामध्ये चढाओढ लागली आहे. कधी महाराष्ट्र तर कधी हरयाणा पुढे जात आहे. मंगळवारी महाराष्ट्र पहिल्या (24, 24, 14 एकूण 66) तर हरयाणा दुसऱया क्रमांकावर (23, 20, 29 एकूण 72) होता. आज कुस्ती आणि ऍथलेटिक्समधील पदकांमुळे ही आकडेवारी बदलली. हरयाणा पुन्हा पहिल्या क्रमांकावर (30, 23, 34 एकूण 87) तर महाराष्ट्र (26, 25, 22 एकूण 73) दुसऱया स्थानावर विराजमान झाला आहे.
इशिता रेवाळेला जिम्नॅस्टिक्सचे रौप्यपदक
प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल, विलेपार्ले येथे प्रशिक्षण घेणारी इशिता सुनील रेवाळे हिने नुकत्याच पार पडलेल्या हरियाणा येथील ‘खेलो इंडिया’ युथ गेम्स जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत फ्लोअर एक्सरसाईज या क्रिडा प्रकारात रौप्य पदकाची कमाई करत वैयक्तिक आठवा क्रमांक मिळवत मुलींच्या महाराष्ट्र संघाला विजेतेपदाचा चषक मिळवण्यास हातभार लावला. कठीण आर्थिक परिस्थितीत वडिलांचे अथक परिश्रम, अरविंद प्रभू (अध्यक्ष), डॉ. मोहन राणे (सचिव), नीलम बाबरदेसाई (जिम्नॅस्टिक्स विभागप्रमुख) यांच्या पाठिंब्यामुळे आणि प्रशिक्षक विशाल कटकदौंड व पूर्व प्रशिक्षक हरीश परब, विदेश दबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली यश मिळवल्याबद्दल इशितावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
























































