अतिवृष्टीचा धोका टळलेला नाही, एनडीआरएफ तैनात; मुख्यमंत्र्यांकडून पूरस्थितीचा आढावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात परतीचा पाऊस आणि वादळी अतिवृष्टीमुळे शेतीपीक आणि मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. पूरपरिस्थतीच्या पार्श्वभूमीवर धाराशीव, सोलापूर, पंढरपूर व बारामतीमध्ये एनडीआरएफच्या तुकडा तैनात करण्यात आल्या तातडीच्या मदतीसाठी हवाई दल, नौदल व लष्कराला हायअलर्टवर ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले आहे. तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला.

पंढरपूर दुर्घटना-मृतांच्या नातेवाईकांना मदत

पंढरपूरातील कुंभार घाट येथे अतिवृष्टीमुळे भिंत कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्र्यांनी दु:ख व्यक्त केले तसेच मृतांच्या नातेवाईकांना तातडीची आर्थिक मदत देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

परतीचा पाऊस

राज्यात अनेक जिह्यांमध्ये विशेषत: पुणे, सोलापूर, धाराशीव आणि लातूर जिह्यात जोरदार पाऊस झाला आहे. सोलापूर जिल्हयात उजनी धरण क्षेत्रातील गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूणे जिह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. बारामती तालुक्यालाही मोठा फटका बसला आहे. धाराशीव, बीड, लातूर जिह्यात अतिवृष्टी झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद प्रतिसाद दलाच्या तुकडय़ा तैनात करण्याबरोबरच तातडीच्या मदतीसाठी अग्निशमन, पोलिस, तसेच महसूल आणि वैद्यकीय अशा सर्वच विभागांना मदत पथके पाठवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.

तातडीने पंचनामे करण्याचे आदेश

अतिवृष्टी, वादळी पावसामुळे शेतीचे, पिकांचे नुकसान याबाबत तसेच घरांची पडझड, मालमत्तांचे नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.