राज्यात वाण व तंत्रज्ञानाच्या 278 शिफारशींना मंजुरी

कृषि तंत्रज्ञानात्मक शिफारशींच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण राज्यातील चारही कृषि विद्यापीठांची त्रिदिवसीय संयुक्त कृषि संशोधन व विकास समिती बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये राज्यातील चारही कृषि विद्यापीठांचे 20 पीक वाण, आठ यंत्रे व अवजारे आणि 250 उपयुक्त पीक उत्पादन तंत्रज्ञानांना मंजुरी देण्यात आली आहे. हे संशोधन याचा हंगामापासून अंमलबजावणीसाठी उपलब्ध होणार आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठातील डॉ. के. आर. ठाकरे सभागृहात आयोजित संयुक्त कृषि संशोधन व विकास समितीच्या बैठकीचा समारोप झाला. महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरुडॉ.प्रशांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित समारोपीय कार्यक्रमालाडॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरुडॉ.शरद गडाख,डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरुडॉ.संजय भावे यांच्यासह चारही कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक, विस्तार शिक्षण संचालक, संशोधन संचालक, शिक्षण संचालक, महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे संशोधन संचालक,डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्य विनायक काशिद आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

संशोधनाव्दारेच राज्यातील कृषि क्षेत्र आज सक्षम झाल्याचेडॉ.प्रशांत पाटील म्हणाले. भविष्यातील कृषि संशोधनाची दिशा शेतकरीभिमुख असण्याची गरजडॉ.शरद गडाख यांनी व्यक्त केली. कृषि शास्त्रज्ञांनी शेतक-यांच्या समस्या व प्रश्न समजून त्यावर काळानुरुप उपाययोजना सुचवणे आवश्यक आहे असे मतडॉ.संजय भावे यांनी व्यक्त केले.

विविध तांत्रिक सत्रामध्ये गटनिहाय झालेल्या संशोधनात्मक सादरीकरणाचे निष्कर्ष व गुणवत्ता तसेच सखोल विचार मंथनातून पिकांचे सुधारित नवीन आशादायक वाण, सुधारित अवजारे व नाविन्यपूर्ण यंत्रे तसेच उपयुक्त कृषि तंत्रज्ञानविषयक शिफारशींना अंतिम मान्यता देण्यात आली. मंजुर पीक वाण, शिफारशी तथा इतर उपलब्धीचेडॉ.राजेंद्र गाडे,डॉ.आम्रपाली शिखरे, डॉ.व्ही. एल. आमोलिक, डॉ.ए.एन. पसलवार, डॉ.अरविंद सोनकांबळे, डॉ.शेषराव चव्हाण, डॉ.एस.व्ही. दिवेकर, डॉ.अनिल कोल्हे, डॉ.शैलेश ठाकरे,डॉ.निशांत शेेंडे,डॉ.राम घोराडे, डॉ.नितीन गुप्ता, डॉ.प्रमोद बकाने, डॉ.ताराचंद राठोड आदींनी सादरीकरण केले. समारोपीय सत्रात चारही कृषि विद्यापीठामधून सेवानिवृत्त होऊ घातलेल्या शास्त्रज्ञांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारीडॉ.किशोर बिडवे यांनी केले तर आभार संशोधन संचालकडॉ.विलास खर्चे यांनी मानले.