Asha Bhosle Funeral – स्वरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, साश्रू नयनांनी अखेरचा निरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानच्या दिग्गज गायिका आशा भोसले यांना सोमवारी साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. आशाताईंच्या पार्थिवावर सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज पार्क दादर येथील स्मशानभूमीमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी क्रीडा, साहित्य, राजकीय आणि चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज उपस्थित होते.

रविवारी सकाळी मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात आशा भोसले यांचे निधन झाले. त्या 92 वर्षांच्या होत्या. सोमवारी सकाळी लोअर परळमधील कासा ग्रँडे येथील निवासस्थानी आशाताईंचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पार्क दादर येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

लोअर परळ येथून निघालेल्या अंत्ययात्रेमध्ये हजारो लोक सहभागी झाले होते. आशा भोसले अमर रहे.. अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. तत्पूर्वी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, सौ. रश्मी ठाकरे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांच्यासह राजकीय क्षेत्रातील आणि चित्रपट सृष्टीतील दिग्गजांनी आशाताईंना श्रद्धांजली अर्पण केली.