नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या! शेतकरी हवालदिल, सरकार असंवेदनशील

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विधानसभेत आज विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला. अवकाळी पावसासह गारपिटीने राज्यात पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार असंवेदनशील आहे. अजूनही अनेक ठिकाणी नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आलेले नाहीत, असा हल्लाबोल करतानाच लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्या, अशी मागणी विरोधी पक्षाने केली.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात शेतकऱ्यांच्या सद्यस्थितीवरून सरकारला धारेवर धरले. ते म्हणाले की, राज्यात अवकाळी पावसासह गारपिटीच्या घटनांत वाढ झाली आहे. राज्यात पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. हवामान खात्याने राज्याला ‘यलो ऍलर्ट’ दिला आहे. मात्र राज्यातील सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर असंवेदनशील आहे. बाजारभाव, अवकाळी पाऊस यामुळे दुहेरी संकटात असणारा शेतकरी नुकसानीचे पंचनामे होत नसल्याने तिहेरी संकटात सापडला आहे, असा घणाघात त्यांनी केला. राज्यातील सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर गेलेले आहेत. त्यात पंचनामे करणारे ग्रामसेवक, तलाठी व कृषी सहाय्यक यांचाही समावेश आहे. त्यामुळे राज्यात नुकसानीचे पंचनामे अद्याप सुरू झालेले नाहीत ही वस्तुस्थिती आहे, असे अजित पवार म्हणाले.

अंबादास दानवे यांचा विधान परिषदेत सरकारवर हल्लाबोल
शेतमालाला हमीभाव नाही, शेतकऱ्यांना मदतीसाठी निधी नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न, समस्या सोडवण्यास हे सरकार पूर्णपणे असमर्थ ठरले आहे. त्यामुळे या सरकारला सत्तेवर बसण्याचा अधिकार नाही, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेत शेतकऱ्यांच्या प्रश्नी आक्रमक भूमिका घेत सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला. शेतकऱ्यांबाबतच्या प्रस्तावावर चर्चा करताना दानवे म्हणाले की, हे सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करणारे आहे. पीक विमा, सिंचन प्रश्न, शेतमालाला हमीभाव, शेतकऱ्यांचा थकीत प्रोत्साहन भत्ता, वीजतोडणी, संततधार, अतिवृष्टीची प्रलंबित मदत, अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान इत्यादी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अंबादास दानवे यांनी सरकारला धारेवर धरले.

शेतकऱयांना नुकसानभरपाई द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा… बळीराजाला अवकाळीची भरपाई मिळालीच पाहिजे… खोके सरकारचा उपयोग काय, शेतमालाला भाव नाय… कांद्याला 500 रुपये मिळालेच पाहिजेत… अशा घोषणांनी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवनाचा परिसर शुक्रवारी दणाणून सोडला.