
गोतस्करीच्या संशयावरून अमरावतीच्या तीन तरुणांना मध्य प्रदेशमधील नर्मदापुरम जिल्ह्यात बेदम मारहाण करण्यात आली. यात ते जबर जखमी झाले असून त्यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
नाझीर अहमद असे त्या मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव असून त्याच्यासोबत शेख लाला व मोहम्मद मुस्ताक हे दोघे होते. हे तिघेही अमरावतीहून 28 गायी ट्रकमध्ये भरून मध्य प्रदेशमध्ये घेऊन जात होते. नर्मदापुरम जिल्ह्यातीस सिओनी मालवा येथे रात्री एकच्या सुमारास त्यांचा ट्रक पोहोचला. त्यावेळी दहा ते पंधरा लोकांच्या जमावाने त्यांचा ट्रक रोखला. त्यानंतर त्यांनी त्या तिघांना मारहाण करायला सुरुवात केली. ते तिघे गायी कत्तलखान्यात विकायला घेऊन जात होते असा त्यांना संशय होता.
त्या तीन तरुणांना मारहाण होत असताना काही गावकऱ्यांनी पोलिसांना कळवले. त्यानंतर तत्काळ पोलीस घटनास्थळी पोहोचले व त्यांनी त्या तिघांना जमावाच्या तावडीतून सोडवले. त्या तिघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथे नाझीरचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी मारहाण करणाऱ्या जमावाविरोधात तसेच गायींना घेऊन जात असलेल्या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे,अशी माहिती पोलीस अधिकारी गुरुकरण सिंग यांनी दिली. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे.


























































