
जी 20 च्या पार्श्वभूमीवर मुंबई शहरातील डी विभागातील आरे दूधपेंद्र इतरत्र स्थलांतरित करण्यात येणार आहेत. पालिकेच्या सूचनेनुसार पेंद्र स्थलांतरित केल्यास केंद्र संचालक आर्थिकदृष्टय़ा उध्वस्त होईल. याची दखल घेऊन योग्य तो मार्ग काढावा, अशी मागणी महाराष्ट्र दूध वितरक सेनेने केली आहे.
जी 20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर मध्य मुंबईतील भुलाबाई देसाई मार्ग, गोपाळराव देशमुख मार्ग, पेडर रोड व इतर काही प्रमुख मार्गावरील आरे स्टॉल स्थलांतरित करण्याबाबत सहाय्यक अभियंता परिरक्षण (डी) विभाग यांनी प्रभारी व्यवस्थापक, वरळी दुग्धशाळा यांना पत्राद्वारे कळविले आहे. बृहन्मुंबई दूध योजनेअंतर्गत 50 वर्षांपासून सदर मार्गावरील आरे दूधकेंद्र, सरिता व एनर्जी केंद्र कार्यरत आहेत. या पेंद्रावर पेंद्र संचालक आपला दैनंदिन व्यवसाय करून उपजीविका करत आहेत. दूधपेंद्र इतरत्र स्थलांतरित करतेवेळी मोडतोड होण्याची शक्यता आहे, तसेच पालिकेने सुचविलेल्या ठिकाणी केंद्र स्थलांतरित केल्या व्यवसायाला फटका बसेल.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दूध वितरक सेनेतर्फे नुकतीच दुग्ध व्यवसाय विकास आयुक्त, बृहन्मुंबई दूध योजनेचे महाव्यवस्थापक, प्रभारी व्यवस्थापक, गोरेगाव यांना पत्र देण्यात आले. तसेच या पत्राची प्रत महानगरपालिका (डी) विभागाचे विभागीय अधिकारी व सहाय्यक अभियंता परिरक्षण विभाग यांना भेटून देण्यात आली. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन योग्य तो मार्ग काढण्याची मागणी केली. महाराष्ट्र दूध वितरक सेनेचे कार्याध्यक्ष राम कदम, कोषाध्यक्ष विलास भुजबळ यावेळी उपस्थित होते.