
आमदार अपात्रतेवरील पुढील सुनावणीला उद्या मंगळवारपासून पुन्हा सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना व्हीप मिळाला नसल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे. तर शिवसेनेने पुरावे सादर करण्यासाठी परवानगी मागितली आहे. यावर विधानसभा अध्यक्ष काय निर्णय देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 2 नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणीत व्हीपबाबत दोन्हीकडच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून घेतला होता. मात्र यावरील निर्णय राखून ठेवला होता. विधानसभा अध्यक्षांनी, 21 नोव्हेंबरपासून नियमित सुनावणी होईल. 6 नोव्हेंबरपर्यंत सर्व कागदपत्रे, 16 नोव्हेंबरपर्यंत सर्व पुरावे सादर करावेत. 31 डिसेंबरपर्यंत मला निर्णय द्यायचा आहे, त्यासाठी पक्षांकडून मला सहकार्य लागेल. अधिवेशन काळातही सुनावणी होईल, असे स्पष्ट केले होते. त्यानुसार उद्यापासून नियमित सुनावणीला सुरुवात होणार आहे.
अध्यक्षांपुढील सुनावणी 25 डिसेंबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पाच दिवसांत अध्यक्ष आपला निर्णय जाहीर करणार आहेत. कायद्यानुसार जनतेला अपेक्षित निर्णय घेतला जाईल, असे अध्यक्ष म्हणाले आहेत.


























































