
शेतकऱयांसाठी आवश्यक असलेल्या गाय, बैल अशा प्राण्यांना बांधावरच नाममात्र शुल्कात वेळेत उपचार मिळावेत यासाठी पशुसंवर्धन विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राज्यातील प्रत्येक तालुक्यात 2022 पर्यंत फिरते पशुवैद्यकीय रुग्णालय सुरू करणार असल्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व्यवसाय विकासमंत्री सुनील केदार यांनी जाहीर केले.
फिरत्या 15 पशुवैद्यकीय रुग्णालयांचा प्रारंभ करण्यात आला असून यातील तीन रुग्णालये जिह्यात असतील. त्यामुळे पशुपालक शेतकऱयांची मोठी गैरसोय दूर होणार आहे. पशुसंवर्धन विभागाने रुग्णालये सुरू करून नवीन पर्वाला प्रारंभ केला आहे. शेतकरी, पशुपालकांचे पशुधन निरोगी ठेवण्याला या विभागाने महत्त्व दिले आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था ही कृषी आणि कृषिपूरक व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे फिरते पशुवैद्यकीय रुग्णालये ही विभागाची नितांत गरज होती. ती पूर्ण करत असल्याचे सांगून येत्या दोन वर्षांत राज्यातील प्रत्येक तालुक्यात ही रुग्णालये सुरू होणार असल्याचे सुनील केदार यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आशीष पातूरकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कमलकिशोर फुटाणे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मंजुषा पुंडलिक, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमिला जाखलेकर आदी उपस्थित होते.
बर्ड फ्लूपेक्षा अफवांमुळे जास्त नुकसान
राज्यात बर्ड फ्लू आटोक्यात आला असून बर्ड फ्लूने माणसांना कोणताही धोका नाही. अद्याप या आजाराने कोणीही दगावला नाही, असे सांगून केदार यांनी एका पक्षाला बर्ड फ्लूची लागण झाल्यास 48 तासांत त्याच्या पोल्ट्री फार्मचे मोठे नुकसान होते. मात्र त्यापेक्षा जास्त नुकसान समाजमाध्यमांवरील अफवांमुळे होते. हिंदुस्थानी खाद्यसंस्कृती ही जगात सर्वाधिक सुरक्षित असून पूर्णतः शिजविलेले चिकन बिनधास्त खाण्याचे आवाहनही त्यांनी केले. तसेच मांसाहारी नागरिकांमधील भीती काढून टाकण्यासाठी त्यांनी नुकतेच ‘चिकन फेस्टिव्हल’चे आयोजन केले होते याची माहितीही त्यांनी दिली. कुक्कुटपालन करणाऱया व्यावसायिकांना नाममात्र दरात पक्ष्यांचा विमा उतरविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

























































