अध्यक्ष भास्कर जाधव यांना शिवीगाळ, गैरवर्तन… भाजपचे 12 आमदार निलंबित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून विधिमंडळात अभूतपूर्व गदारोळ उडाला. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत सत्ताधारी पक्षाकडून मंत्री छगन भुजबळ यांनी मांडलेल्या ठरावासंदर्भातील चर्चेदरम्यान आधी शाब्दिक वाद, आरोप-प्रत्यारोप, नंतर गदारोळ आणि त्याचे रूपांतर पुढे अक्षरश: राडय़ात झालं. केंद्र सरकारकडून एम्पेरीकल डेटा मिळवण्यासंबंधी सत्ताधारी पक्षाने मांडलेला ठराव आवाजी मतदानाने मंजूर केला जात असताना भाजप सदस्यांनी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्या आसनाकडे धाव घेत जोरदार विरोध केला. अध्यक्षांसमोरचा माईक तोडण्याचा व राजदंड पळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. ओबीसी आरक्षणाच्या ठरावावरून आक्रमक झालेले भाजपचे सदस्य एवढय़ावरच थांबले नाहीत, तर सभागृह तहकूब झाल्यानंतर त्यांनी अध्यक्षांच्या दालनाकडे धाव घेत तेथे गोंधळ घातला. हमरीतुमरीवर आलेल्या भाजपच्या सदस्यांनी तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. याप्रकरणी 12 आमदारांवर एक वर्षासाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गोंधळ घालण्याचा भाजप सदस्यांचा डाव त्यांच्याच अंगलट आला. विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी कामकाज पुकारण्याआधीच भाजप सदस्यांनी स्थगन प्रस्तावाच्या मागणीवरून गोंधळ करण्यास सुरुवात केली होती. एमपीएससी नियुक्त्यांवरून सुरू झालेल्या गोंधळावेळी वेलमध्ये आलेले विरोधी सदस्य पुन्हा जागेवर जाऊन बसलेच नाहीत. कागदपत्रे सादर झाल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसींच्या एम्पेरिकल डेटासंदर्भात केंद्र सरकारकडे मागणी करण्याचा प्रस्ताव मांडण्यास सुरुवात केली. यावेळी विरोध आणि गोंधळाचीच भूमिका घेतलेल्या भाजप सदस्यांकडून वेलमध्ये येऊन घोषणाबाजी सुरूच होती. त्यावेळी तालिका अध्यक्ष म्हणून भास्कर जाधव हे सभागृहाचे कामकाज चालवत होते. देवेंद्र फडणवीस यांनी यावर बोलण्याची मागणी करताच त्यांना परवानगी देण्यात आली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालयाकडून एम्पेरिकल डेटा नव्हे, तर एम्पेरिकल एन्क्वायरीबाबत सांगण्यात आले आहे. हे राज्य सरकारला मागासवर्ग आयोगाकडूनच करून घ्यावे लागणार असल्याचे सांगण्यात आले.

विरोधी पक्षांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न

जो ठराव एकतर्फी मंजूर करण्यात आलेला आहे तो लोकशाहीचा खून करण्यात आलेला आहे. विरोधी पक्षाची संख्या कमी करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न आहे. आम्ही सातत्याने सरकारवर हल्ला करतो म्हणून हा प्रयत्न आहे. ही मुस्कटदाबी आम्ही सहन करणार नाही. आम्ही कामकाजावर बहिष्कार टाकतोय. हे एकतर्फी कामकाज आहे. हे मोगलाईचं कामकाज आहे. असे कामकाज आम्ही सहन करणार नाही, असा संताप व्यक्त करीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधकांनी सभात्याग केला.

अध्यक्षांच्या दालनात धक्काबुक्की

ओबीसी आरक्षणासाठी आग्रही असल्याचे दाखवणाऱया भाजप सदस्यांनी ठराव पास झाल्यानंतर त्यावर गोंधळ घातला. सभागृह तहकूब झाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली थेट अध्यक्षांचे दालन गाठले. राडा करण्याच्या तयारीतच आलेल्या सदस्यांकडून अध्यक्षीय दालनाचा दरवाजा थेट ढकलण्यात आला. झिरवळ यांच्याशी बोलत असलेल्या भास्कर जाधव यांनी फडणवीस, शेलार तसेच चंद्रकांत पाटील यांना बसून चर्चा करण्यास सांगितली. त्याचवेळी काही सदस्यांनी थेट शिवराळ भाषेत भास्कर जाधव यांच्या अंगावर धावून जाण्यास सुरुवात केली. तिथे नेटाने उभे राहिलेल्या भास्कर जाधव यांना जोरदार धक्काबुक्की करण्यात आली. ही बाब स्वतः भास्कर जाधव यांनी सभागृहात सांगितली.

कारवाईची मागणी

दहा मिनिटांनी सभागृह जेव्हा सुरू झाले तेव्हा फडणवीस यांनी पुन्हा एकदा एम्पेरिकल डेटासंदर्भातील आपली माहिती कशी योग्य आहे सांगण्यास सुरुवात केली. त्याचवेळी सुनील प्रभू यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करीत विधानसभेत तालिका अध्यक्षांसमोर आणि त्यानंतर त्यांच्या दालनात जाऊन त्यांना धक्काबुक्की करण्याचा प्रकार निंदनीय असल्याचे सांगितले. त्यांच्यावर कारवाईची मागणी केली असता सत्ताधारी बाकावरील सदस्यांनी ‘शेम शेम’ म्हणत या कृत्याचा धिक्कार केला. याचवेळी मंत्री नवाब मलिक यांनी उभे राहत या सदस्यांवर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली. हीच मागणी त्यांनी सभागृह पाच वेळा तहकुबीनंतर सुरू झाल्यानंतर लावून धरली. तालिका अध्यक्षांनी अध्यक्षांच्या दालनात काय झाले ते जनतेला कळू द्या. जे सत्य घडले ते सर्वांसमोर मांडा, अशी मागणी त्यांनी तालिका अध्यक्षांकडे केली.

सत्ताधारी पक्षाकडून संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी 12 आमदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव सभागृहात मांडला.

हेच ते 12 आमदार

  • आशीष शेलार
  • संजय कुटे
  • गिरीश महाजन
  • अतुल भातखळकर
  • पराग अळवणी
  • अभिमन्यू पवार
  • हरीश पिंपळे
  • राम सातपुते
  • जयकुमार रावल
  • योगेश सागर
  • नारायण कुचे
  • कीर्तिकुमार भांगडिया

केंद्राच्या योजनांसाठी एम्पेरिकल डेटा मिळतो, ओबीसी आरक्षणासाठी का नाही?

फडणवीस यांच्यानंतर प्रस्ताव मांडण्यास उभे राहिलेल्या छगन भुजबळ यांनी यूपीए सरकारच्या काळात तयार करण्यात आलेला जातीनिहाय एम्पेरिकल डेटा आता पंतप्रधान मोदी यांच्या ताब्यात आहे. हाच डेटा केंद्र सरकारच्या उज्वला गॅस योजना तसेच अन्य योजनांसाठी वापरला जातो; मात्र हा ओबीसी आरक्षणासाठी का मिळत नाही, असा सवाल केला. हा डेटा मिळाल्यास पुन्हा जातीनिहाय जनगणनेची आवश्यकता नाही. ओबीसींचे राजकीय आरक्षण सिद्ध करण्यास हा डेटा पुरेसा आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडे या डेटाची मागणी करीत असल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले.

ठराव मंजूर होताच विरोधकांचा गोंधळ

  • छगन भुजबळ यांनी ठराव मांडताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बोलण्याची मागणी केली. याच वेळी तालिका अध्यक्षांनी ठराव मांडण्यास सांगितला. भुजबळ यांनी ठराव मांडताच अध्यक्षांनी त्यावर मतदान पुकारले. मात्र गोंधळ घालण्यात व्यस्त असलेल्या विरोधी सदस्यांनी मतदानात भाग घेतला नाही. हा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आल्यानंतर विरोधी बाकावरील सदस्य संतापले.
  • फडणवीसांनी जोरजोराने हातवारे करण्यास सुरुवात केली. त्यांनी इअरफोन काढून फेकत कागदपत्रे मेजावर आपटताच सदस्यांचा गोंधळ आणखी वाढला. काही सदस्य अध्यक्षांसमोरील मेजावर आले. यावेळी फडणवीसांकडून सदस्यांना आवरण्याचा कोणताही प्रयत्न करण्यात आला नाही. संजय कुटे यांनी माईक खेचल्यानंतर अध्यक्षांनी ताकीद दिली. त्याचवेळी गिरीश महाजन यांच्यासह सदस्यांनी राजदंड खेचण्याचा प्रयत्न केला.

अध्यक्षांच्या दालनात काय घडले? व्हिडीओ व्हायरल

थेट निलंबनाची कारवाई होण्याइतका काय गोंधळ अध्यक्षांच्या दालनामध्ये घडला यासंदर्भातील व्हिडीओच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी ट्विट केलाय. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी अध्यक्षांच्या दालनात भास्कर जाधव यांना जाऊन घेरले. त्यांच्याशी धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. अशी घटना महाराष्ट्राच्या इतिहासात कधी घडलेली नाही. दुŠखद हे आहे की, हे घडत असताना याचा पुढाकार या राज्याचे विरोधी पक्षनेते करत होते, असे मलिक यांनी म्हटले आहे.

भास्कर जाधव म्हणाले… मला आई-बहिणीवरून शिव्या दिल्या

ओबीसी आरक्षणाच्या ठरावावर चर्चा सुरू असताना काही सदस्यांनी आज सभागृहात गदारोळ केला. त्यानंतर विरोधी सदस्य अध्यक्षांच्या दालनात घुसले आणि मला आई-बहिणीवरून शिव्या दिल्या. एखाद्या गावगुंडाप्रमाणे हे सदस्य वागत होते. आजचा दिवस हा लोकशाहीला काळिमा फासणारा आहे, अशा शब्दांत तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी विरोधकांचे कान उपटले.

जाधव म्हणाले…

  • गेली 36 वर्षे मी विधिमंडळात आहे, पण आज जे घडले ते आजवर कधीही बघितले नव्हते.
  • सभागृहात मतभेद अथवा वाद झाले तर अध्यक्षांच्या दालनात त्यावर तोडगा काढला जातो. सभागृहाबाहेर कधीही कटुता ठेवली जात नाही. महाराष्ट्राची ही संस्कृती आहे.
  • पण आज सभागृह तहकूब करून उपाध्यक्षांच्या दालनात गेलो तेव्हा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस एकदम रागाने तेथे आले. त्यांचे रागावणे स्वाभाविक होते. अन्य काही सदस्यही पाठोपाठ आत आले व त्यांनी आपल्याला थेट आई-बहिणीवरून शिव्या सुरू केल्या. गावगुंडाप्रमाणे तुटून पडले होते.
  • वरिष्ठ सदस्य त्यांना आवर घालत नव्हते. अत्यंत लांच्छनास्पद व महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासणारा हा प्रकार होता.
  • हा सर्व प्रकार सीसी टीव्ही कॅमेऱयात चित्रित झालेला आहे. माझ्याकडून एक जरी असंसदीय शब्द वापरला गेला असेल तर मीही शिक्षा घ्यायला तयार आहे.
  • मी आजवर कधीही असंसदीय शब्द वापरला नाही.

कुणी वासरू मारले म्हणून गाय मारू नये – फडणवीस

12 आमदारांच्या निलंबनानंतर संतप्त झालेल्या देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण देण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, ‘अध्यक्ष महोदयांनी जी वस्तुस्थिती सांगितली, त्यात हे सांगितले पाहिजे की, तिथे शिवसेनेचे आमदारही आले होते. तेथे शिवसेनेचे आमदार आणि भाजपाचे आमदार यांच्यात बाचाबाची झाली. त्यावेळी मी स्वतः पूर्ण लोकांना बाहेर काढले. हे खरे आहे की, आम्ही रागात होतो. बाचाबाची झाली. पण नंतर आपण गळाभेट घेतली. हे खरे आहे की, काही लोकांचे शब्द चांगले नव्हते. त्याचक्षणी आम्ही तुमची माफी मागितली. हेदेखील नोंदवले पाहिजे. पण, हे पुढे करून विरोधकांची संख्या कमी करत असतील, तर हे योग्य नाही,’ असे मत फडणवीस यांनी मांडतानाच अध्यक्षांकडून या विषयावर चर्चेची अपेक्षा व्यक्त केली. मोठय़ा मनाने विरोधकांना बोलावून चर्चा केली पाहिजे. त्यानंतर कारवाई करायची असेल तर करावी; अन्यथा कुणी वासरू मारले म्हणून दुसरा गाय मारेल, अशी अवस्था याठिकाणी होणार असेल तर लोकशाहीला योग्य नाही, असा इशारा फडणवीस यांनी दिला.

आशीष शेलार यांनी मागितली अध्यक्षांची माफी

देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही भास्कर जाधव यांची माफी मागितली असे विधान केले. त्यावर बोलताना भास्कर जाधव म्हणाले, माफी मागितली, पण ती आशीष शेलार यांनी माफी मागितली, तेही सर्व झाल्यानंतर. म्हणजे, आधी लाथ लावायची मग सॉरी म्हणायचे असा प्रकार आहे. यासंदर्भात आशीष शेलार यांनीही प्रसिद्धी माध्यमांसमोर बोलताना, मी पक्षाच्या सर्व सदस्यांच्या वतीने भास्कर जाधव यांची माफी मागितली, तरीही माझे निलंबन केले असे सांगितले.

ओबीसी समाजाचे आरक्षणावरून नुकसान होईल असे सभागृहाच्या पटलावर येत होते म्हणूनच भाजपचे काही आमदार आक्रमक झाले. आम्हाला बोलू द्या अशी मागणी करीत अध्यक्षांच्या खुर्चीपर्यंत पोहचले. त्यांना मी मागे घेण्यासाठी गेलो हे सभागृहात सर्वांनी पाहिले. त्यानंतर अध्यक्षांच्या दालनातसुद्धा आम्हाला बोलू द्या अशी मागणी आमदार करीत होते, पण त्यांचे म्हणणे ऐकले नाही. आम्ही कोणत्याही प्रकारची शिवीगाळ केलेली नाही. हवे तर अध्यक्षांच्या दालनातील सीसीटीव्ही फुटेज पाहावे, असे शेलार म्हणाले.

नेमके काय घडले

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत ओबीसींचा एम्पेरीकल डेटा केंद्र सरकारकडून मिळावा असा ठराव मांडला. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपची भूमिका मांडली.

त्यानंतर भुजबळांनी उज्ज्वला गॅससाठी डेटा वापरला जातो. मग ओबीसींच्या आरक्षणासाठी का दिला जात नाही, असा सवाल केला.

त्यावर फडणवीसांनी हरकत घेतली, पण त्यावेळी तालिका अध्यक्षांनी त्यांचा मुद्दा फेटाळून लावला. यामुळे संतप्त झालेल्या भाजप आमदारांनी अध्यक्षांच्या समोरील मोकळय़ा जागेत येत घोषणाबाजी करत गोंधळ घातला.

काही सदस्यांनी डायसवर चढत तालिका अध्यक्षांना घेरले. एका आमदाराने अध्यक्षांचा माईक ओढला.

अध्यक्षांनी सभागृहात गोंधळ घालणाऱया सदस्यांना तुम्हाला मी नेम करत आहे (कारवाईचा इशारा) असे सांगत 10 मिनिटांसाठी सभागृह तहकूब केले.

त्यानंतर पुन्हा सभागृह सुरू झाले. मात्र विरोधकांचा गोंधळ आणि अध्यक्षांच्या दालनातून ओरडण्याचा आवाज येत असल्याने पुन्हा कामकाज 15 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.

त्याचवेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अध्यक्षांच्या दालनात पोहोचले.

फडणवीसांसोबत तेथे आलेल्या भाजप सदस्यांनी ठराव मंजूर करण्यात आल्याबाबत जाधव यांना जाब विचारला. राग अनावर झालेल्या भाजप सदस्यांकडून भास्कर जाधव यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यात आली.