विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनला 17 जूनपासून मुंबईत सुरुवात होत आहे. तेरावी विधानसभा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे हे शेवटचे अधिवेशन आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर आत्मविश्वास गमावलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अधिवेशनात स्वतःचा ठसा उमटवण्यासाठी आटापिटा करावा लागणार आहे. त्यामुळे राज्यातील दुष्काळ पाणी प्रश्न, शेतकरी कर्जमाफी, मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावरून सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जाईल. अधिवेशनाच्या दुसर्‍याच दिवशी म्हणजे 18 जून रोजी राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत सादर होईल. पण निवडणुकीपूर्वीचा अर्थसंकल्प असल्यामुळे यंदा कोणत्याही नव्या करांचा बोजा टाकला जाणार नाही, अशी चिन्हे आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकाभिमुख अर्थसंकल्प सादर होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

तरीही वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशातील मराठा आरक्षण, नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणावरून विरोधकांकडून सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी चिन्हे आहेत.