मुंबईत 208 तर राज्यात 4405 रुग्ण, दुसऱ्या लाटेतील सर्वात नीचांकी संख्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत कोरोना नियंत्रणात असला तरी दररोजची रुग्णसंख्या सुमारे 400 ते 500 येत असल्यामुळे चिंता कायम होती. मात्र, गेल्या काही दिवसांत रुग्णसंख्या 400 पेक्षा खाली आली असून मुंबईत आज दिवसभरात 208 रुग्ण सापडले तर राज्यातही रुग्णसंख्या 5 हजारपेक्षा कमी होऊन आज दिवसभरात 4 हजार 405 रुग्ण सापडले. दुसऱया लाटेतील ही सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. त्यामुळे मुंबईसह राज्याला दिलासा मिळाला आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेकडून अहोरात्र मेहनत घेतली जात असून लसीकरणावर भर देण्यात येत आहे. त्यामुळेच मुंबईसह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणात कमी होत आहे. मुंबईत दुसऱया लाटेत आज सर्वाधिक कमी म्हणजे 208 रुग्ण सापडले. या आधी 26 जुलैला 299 तर 20 जुलैला मुंबईत 351 रुग्ण सापडले होते. दरम्यान, मुंबईत आज 3 रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महापालिका अहोरात्र मेहनत घेत असून कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 97 टक्क्यांवर पोहोचले आहे तर रुग्ण दुपटीचा कालावधी 1 हजार 680 दिवसांवर पोहोचला आहे.

मुंबईत दिवसभरात 97 हजार व्यक्तींचे लसीकरण

मुंबईत राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिका यांच्याकडून आणि खासगी रुग्णालयांच्या सहकार्याने सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेत आज दिवसभरात 97 हजार 967 जणांचे लसीकरण झाले. यात परदेशात शिक्षण आणि नोकरीसाठी जाणारे 600 आणि अंथरुणाला खिळून असलेल्या 75 जणांचा समावेश आहे. आतापर्यंत पहिला डोस घेणाऱयांची संख्या 57 लाख 11 हजार 686 वर पोहोचली आहे तर दुसरा डोस घेणाऱयांची संख्या 19 लाख 1 हजार 798 वर पोहोचली आहे. दरम्यान, राज्यात रविवार, 8 ऑगस्टपर्यंत 4 कोटी 67 लाख 58 हजार 931 जणांचे लसीकरण झाले आहे.

मृत्युदरात घट

मुंबईत गेल्या काही दिवसांत मृत्यूचे प्रमाण घटले असून आज दिवसभरात 3 रुग्णांचा मृत्यू झाला. गेले काही दिवस मृत्यूचे प्रमाण दिवसाला 9 इतके होते. तर राज्यात 68 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातही दीडशेच्या पुढे असलेला मृत्यूचा आकडा आज 70 च्या खाली आला आहे.