
मुंबईसह राज्यातील 24 महानगरपालिका निवडणुकीसाठी नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश नगरविकास विभागाने आज जारी केले आहेत. मुदत संपलेल्या व नजीकच्या कालावधीत मुदत संपत असलेल्या महानगरपालिकांच्या आगामी निवडणुकीसाठी 2011च्या जनगणनेनुसार प्रभागांची संख्या-रचना निश्चित करून प्रभाग रचनेचे प्रारुप तयार करण्याचे काम तत्काळ सुरू करण्याचे आदेश नगरविकास विभागाने संबंधित महापालिका आयुक्तांना दिले आहेत. त्यामुळे नजीकच्या काळात महापालिका निवडणुकांचे बिगूल वाजण्याची चिन्हे आहेत.
राज्यात महाविकास आघाडी सरकारने लोकसंख्या वाढीच्या आधारावर सरासरी प्रभाग/वॉर्ड संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मुंबईसह राज्यातील बहुतेक सर्व महापालिकांत 9 नगरसेवकांची वाढ झाली होती. मात्र महाविकास आघाडी सरकारचा निर्णय नव्या सरकारने बदलला होता. सध्या हे प्रकरण न्यायालयात आहे. त्यावर अद्याप सुनावणी झालेली नाही. येत्या 28 नोव्हेंबर रोजी याबाबत सुनावणी होणार आहे.
कोर्टाचे आदेश येण्यापूर्वीच वॉर्ड पुनर्रचना
राज्य सरकारने कोर्टाच्या निर्णयाची वाट न पाहता आपल्या अधिकारात महापालिका प्रशासनाला प्रभाग, वॉर्डाची संख्या निश्चित करून प्रभाग रचना नव्याने करण्याचे आदेश दिले आहेत. 2011 च्या जनगणनेनुसारच 2017 साली झालेल्या सार्वत्रिक महापालिका निवडणुकीत जी प्रभाग/वॉर्ड संख्या होती तेवढीच संख्या निश्चित करण्यात येणार आहे. मागील 5 वर्षाच्या कालावधीत ज्या महापालिका हद्दीत गावे वगळली किंवा नव्याने समाविष्ट करण्यात आली अशा महापालिकेतील नगरसेवकांची संख्या बदलणार आहे. पुणे, कल्याण डोंबिवली, वसई – विरार या तीन महापालिका हद्दीत गावे वगळली किंवा समाविष्ट करण्यात आली आहेत. उर्वरित महापालिकांची प्रभाग रचना 2017 प्रमाणेच होण्याची शक्यता आहे.
या 24 महापालिकांच्या प्रभागांची पुनर्रचना
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण- डोंबिवली, उल्हासनगर, वसई-विरार, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अकोला, अमरावती, नागपूर, संभाजीनगर नांदेड- वाघाळा, लातूर, परभणी, चंद्रपूर, भिवंडी- निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा-भाईंदर या 23 महापालिकांची मुदत संपली आहे. तेथे सध्या प्रशासक कारभार पाहत आहेत. तर नव्याने महापालिका झालेल्या इचलकरंजी महापालिकेची प्रथमच निवडणूक होईल


























































