ड्रग्स प्रकरण – ललित पाटीलसह 15 जणांवर 3150 पानांचे आरोपपत्र दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ड्रग्स माफिया ललित पाटीलसह 15 जणांवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने तब्बल 3150 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. ड्रग्स रॅकेट प्रकरणी ललित पाटील त्याचा भाऊ भूषण पाटील आणि इतर साथीदारांच्या विरोधात हे आरोपपत्र पुणे पोलिसांनी न्यायलयात दाखल केले.

पुण्यातील ससून रुग्णालयात आजारपणाचे कारण देत ललित पाटील ड्रग्स रॅकेट चालवत होता. त्यावेळी ससून रुग्णालयातील गेटवर 2 कोटी 14 लाखांचे ड्रग्स सापडले होते. या रॅकटेचा तपास करताना बड्या लोकांचा हात असल्याचे उघड झाले. ससून रुग्णालयातील कर्मचारी, पोलीस, कारागृह पोलीस, कारागृहातील डॉक्टरांसह ससून रुग्णालयातील डॉक्टरांचा संबंध असल्याचं समोर आले होते. या प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले होते आणि सहा जणांना निलंबित करण्यात आले होते.

आता या प्ररकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी मास्टरमाईंड ललित अनिल पाटील, अरविंद कुमार प्रकाशचंद्र लोहरे, अमित जानकी सहा ऊर्फ सुभाष जानकी मंडल, रौफ रहीम शेख, भूषण अनिल पाटील, अभिषेक विलास बलकवडे, समाधान बाबूराव कांबळे, इमरान शेख ऊर्फ आमिर अतिक खान, हरिश्चंद्र उरवादत्त पंत, रेहान ऊर्फ गोलू आलम सुलतान मोहम्मद अन्सारी, प्रज्ञा अरुण कांबळे ऊर्फ प्रज्ञा रोहित माहिरे, जिशान इक्बाल शेख, शिवाजी अंबादास शिंदे, राहुल पंडित ऊर्फ रोहित कुमार चौधरी ऊर्फ अमित कुमार यांची आरोपपत्रात नावे आहेत.