दिल्ली दरबारातील हजेरीनंतर ‘वर्षा’वर खलबतं; मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटपावरून तणाव कायम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपावरून शिंदे-फडणवीस-पवार सरकारमध्ये तणाव कायम आहे. अर्थ खात्यासह इतर महत्त्वाची खाती हवीतच, असा हट्ट धरत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी थेट दिल्ली गाठली. खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या बैठकीतून मात्र ठोस असे काही निष्पन्न झाले नाही.

एकीकडे मंत्रीपद आणि पालकमंत्रीपदावरून आमदार निर्वाणीचा इशारा देत असतानाच गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात महत्त्वाची बैठक होणार आहे. ‘वर्षा’ निवासस्थानी दुपारी साडे अकराच्या सुमारास ही बैठक होणार असल्याची माहिती माध्यमांनी दिली आहे. या बैठकीमध्ये काय होणार याकडे राज्यातील नागरिकांसह लोकप्रतिनिधींचे लक्ष लागले आहे.

दिल्लीत काय झालं?

दरम्यान, अजित पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल यांनी बुधवारी रात्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपासंदर्भात चर्चा झाल्याचे वृत्त आहे. मात्र प्रफुल्ल पटेल यांनी अशी कोणतीही चर्चा झाल्याचे नाकारले आहे. आम्ही सरकारमध्ये सहभागी झाल्यापासून दिल्लीत अजित पवार आणि माझी भाजपा पक्षश्रेष्ठींची भेट झाली नव्हती, आमच्यात बोलणं झाले नव्हते. म्हणून एक औपचारिक भेट म्हणून दिल्लीला गेल्याचे पटेल यांनी म्हटले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

अर्थखात्यावरून राडा

अजित पवार यांच्या गटाला महत्त्वाची खाती आपल्या कोट्यातून देण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोध दर्शविला. त्याचबरोबर अजितदादा आम्हाला अर्थमंत्री म्हणून न्याय देत नाहीत, असे रडगाणे गात मिंधे गटाचे आमदार गात होते. त्यामुळे मिंधे गटासह भाजपच्या आमदारांचाही पवार यांच्याकडे अर्थखाते देण्यास विरोध आहे. ग्रामीण राजकारणावरील पकड व राष्ट्रवादीवरील पकड अधिक मजबूत करण्यासाठी अजितदादांना हे महत्त्वाचे खाते हवे आहे.

दोघांत तिसरा… आणि आता चौथादेखील…

मंत्रिमंडळ विस्ताराच्या विलंबामागे खातेवाटप हे प्रमुख कारण असले तरी अगोदरच दोघांत तिसरा म्हणत अजितदादांना सरकारमध्ये सामील करून घेणार्‍या दिल्लीतील भाजपच्या चाणक्यांनी आता काँग्रेस आमदारांचाही एक गट फोडण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. काँग्रेसमधील आमदार एका गटाने फुटण्याची शक्यता आहे, मात्र काँग्रेसमधून फुटणार्‍या आमदारांची संख्या तुलनेने अगदीच कमी असल्याने या गटाचे काय करायचे, हा गट सरकारमध्ये सामील झाला तर त्यांना कोणती मंत्रीपदे द्यायची, हा भाजप नेतृत्वापुढचा पेच असल्यानेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ मंत्र्यांना शपथ घेऊनही तब्बल दहा दिवस झाले तरी बिनकामाचे आणि बिनखात्याचे मंत्री म्हणून फिरावे लागत आहे.

बच्चू कडू यांचं ठरलं! मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी चर्चा करून 11 वाजता निर्णय करणार जाहीर