दिल्लीतून गुबू-गुबू वाजलं की हे नंदीबैलासारखी मान डोलावतात; अमोल कोल्हेंचा अजित पवारांवर निशाणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला आता कोल्हे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अमित शहा जो निर्णय देतील तोच यांना मान्य करावा लागणार आहे. दिल्लीतून येणारे निर्णय त्यांना मान्य करावेच लागतात. दिल्लीतून गुबू-गुबू वाजलं की हे नंदीबैलासारखी मान डोलावतात, अशा शब्दांत अमोल कोल्हे यांनी अजित पवार आणि त्यांच्या गटावर निशाणा साधला आहे.

शिरुर लोकसभेची जागा महायुतीतील अजित पवार गटाला मिळण्याची शक्यता असल्याने अजित पवार यांनी या मतदारसंघात मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. त्यांनी यावेळी या मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली होती. सिने अभिनेत्यांचे राजकारणात काय काम असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. तसेच ते राजीनामा देण्याच्या तयारीत होते, असेही अजित पवार म्हणाले. त्यावर कोल्हे यांनी अजित पवार यांच्यावर पलटवार केला आहे.

अमित शहा जो निर्णय देतील तोच यांना मान्य करावा लागणार आहे. त्यामुळे दिल्लीतून गुबू-गुबू वाजलं की हे नंदीबैलासारखी मान डोलावतात, अशी त्यांची अवस्था आहे. तसेच हा मतदारसंघ त्यांना मिळेल की नाही, हे माहिती नाही. मात्र, शरद पवार यांच्या विचाराने आणि आशीर्वादाने माझी तयारी सुरू आहे, ही निवडणूक केवळ अमोल कोल्हेची नाही तर महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे, असेही अमोल कोल्हे म्हणाले. उमेदवारीसाठी अढळराव पाटीलांची धावपळ मी पाहिली आहे. शिवाजीराव आढळराव पाटील हे नक्कीच इच्छुक आहेत, असा टोलाही कोल्हे यांनी लगावला.

आपल्या नेत्याकडे एखादी गोष्ट बोलणं वेगळं आणि दुसरीकडे काम करणे वेगळं आहे. ते त्यावेळचे नेते असल्याने मी त्यांच्याकडे राजीनामाचा विषय काढला असला तरी कामात कुठल्याही प्रकारचा खंड पडू दिला नाही. म्हणूनच मला तीन वेळेला संसदरत्न पुरस्कार मिळाला. अनेक कामांमध्ये मी पाठपुरावा केला आणि ते काम केले. त्यामुळे मी एखादी गोष्ट बोललो त्याचच भांडवल न करता कामाचा देखील मूल्यमापन व्हायला हवं असं अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे. विधानसभेचा प्रचार करत असताना डॉ. अमोल कोल्हे फक्त सेलिब्रिटी आहे, अशी त्यांची भावना होती का? असा सवालही अमोल कोल्हे यांनी अजित पवारांना केला आहे.