…तर शरद पवारांनी अजित पवारांची इच्छा पूर्ण केली असती; जयंत पाटलांचे महत्त्वाचे वक्तव्य

लोकसभा निवडणुकांच्या चार टप्प्यांचे मतदान झाले आहे. आता पाचव्या टप्प्यातील प्रचाराला वेग आला आहे. राज्यात यंदा बारामती मतदारसंघ चर्चेचा विषय आहे. या मतदारसंघात पवार विरुद्ध पवार अशी लढत बघायला मिळाली. तसेच पवार कुटुंबात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडल्या. आता अजित पवारांबाबत जयंत पाटील यांनी केलेल्या एका वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. अजित पवार थोडे थांबले असते तर शरद पवार यांनी त्यांची एक इच्छ पूर्ण केली असती, असे जयंत पाटील म्हणाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटण्यापूर्वी अजित पवारांनी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष होण्याची इच्छा व्यक्त केली होती. ते आणखी 5-6 दिवस थांबले असते तर शरद पवार हे त्यांची ती इच्छाही पूर्ण करणार होते, अशी माझी माहिती आहे, असे पाटील यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. राष्ट्रवादीपासून वेगळे झाल्यावर अजित पवार यांची राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण झालेली नाही. असा निर्णय घेतल्यामुळे आपली प्रतिमा खराब होईल, याची त्यांना कल्पना असेल. मात्र, तरीही दबावापोटी त्यांना तो निर्णय घ्यावा लागला, यातंच सगळे आले. अजित पवार आणि माझ्यात कोणताही सुप्त संघर्ष नव्हता,असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 70 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा उल्लेख करताच आमच्या पक्षातील अनेकजण तिकडे गेले. केंद्रीय तपास यंत्रणांच्या भीतीमुळे त्यांना हा निर्णय घ्यावा लागला. तसा दबाव टाकण्याचा प्रयत्न माझ्याही बाबतीत एकदा झाला होता. मी पूर्ण एक दिवस ईडीच्या कार्यालयात हजेरी लावून आलो. मात्र त्याचा माझ्यावर काहीही परिणाम झाला नाही, असेही पाटील यांनी सांगितले.

भाजपच्या कुरघोड्यांमुळे आमचा पक्ष दुभंगला जाईल, असे आम्हाला वाटले नव्हते. कारण शरद पवार यांनी एक कुटुंब म्हणून हा पक्ष जपला होता. सगळ्यांच्या उणिवाही सांभाळून घेतल्या होत्या. मात्र, पंतप्रधानांनी घोटाळ्याचा उल्लेख केल्यानंतर आमचा पक्ष फुटला. या फुटीला कोणतेही कारण नाही. पक्ष का फुटला, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे, असा टोलाही पाटील यांनी अजित पवार गटाला लगावला.