अजित पवार बारामतीतच अडकले, भाजपने त्यांना लोकल नेता केले; रोहित पवार यांचे टिकास्त्र

राज्यातील सर्वांचे लक्ष बारामती मतदारसंघाकडे आहे. या मतदारसंघात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात लढत होत आहे. या लढतीमुळे या मतदारसंघाबाबतची उत्सुकता वाढली आहे. तसेच धमकी प्रकरण आणि येथील सभा याची राजकीय वर्तुळात चर्चा होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार अजित पवार आणि त्यांच्या गटावर सातत्याने हल्ला चढवत असतात. आता रोहित पवार यांनी पुन्हा एकदा अजित पवार यांच्यावर टिकास्त्र सोडले आहे.

भाजपने एका मोठ्या नेत्याला संपवले, अशा शब्दांत रोहित पवार यांनी अजित पवार यांना इशारा दिला होता. त्यानंतर आता पुन्हा त्यांनी अजित पवार आणि भाजप यांच्यातील संबंधावरून अजित पवारांवर निशाणा साधला आहे. भाजपने अजित पवारांना लोकल नेता केले आहे. त्यांनी बारामतीत अडकून राहावे, ही भाजपची चाल असल्याची टीका रोहित पवारांनी अजित पवारांवर केली आहे.

अजित पवार शरद पवारांच्या नेतृत्वात काम करायचे तेव्हा ते महाराष्ट्रभर फिरायचे. पण भाजपने त्यांना लोकल नेता केल्याने ते सध्या बारामतीत अडकले आहेत. शरद पवार यांच्या वयाचा नेहमी उल्लेख करण्यात येतो. मात्र, आमचा हा य़ुवा नेता राज्यभर 40 ते 50 सभा घेणार आहे. मात्र अजित पवार फक्त बारामतीत फिरताना दिसत आहे. महाराष्ट्रभर अजित पवारांनी बोलू नये, अशी भाजपची इच्छा आहे. त्यामुळे ते बारामतीतच अडकून पडले आहेत. तसेच त्यांचा उमेदवार तीन लाख मतांनी मागे असल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्यांची चिंता वाढली असून ते बारामतीतच अडकून पडणार असल्याचे दिसते, असेही रोहित पवार म्हणाले.